लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई

By सोमनाथ खताळ | Published: May 18, 2024 10:15 PM2024-05-18T22:15:31+5:302024-05-18T22:17:02+5:30

पोस्ट काढायला लावून बजावली नोटीस

Controversial posts on social media Action against 42 persons by Beed police | लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई

लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई

सोमनाथ खताळ, बीडसोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. अशाच लोकांचा शोध घेऊन बीड पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. शनिवारपर्यंत ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोस्ट काढून टाकायला लावत पोलिसांनी नोटीसही बजावली. तसेच यानंतर वादग्रस्त पोस्ट केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतू त्यानंतर सोशल मीडियावरून वातावरण तापू लागले आहे. काही लोक आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद होऊ लागले आहेत. चार दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे एका पोस्टमुळे दोन गटात दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले. २०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर इतर ठिकाणीही निवडणूक कारणावरून वाद झाले आहेत. हे वाढते वाद पाहता पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नये, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय नेते, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये, असे सांगितले आहे. असे असतानाही काही लोकांनी वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना सीआरपीसी १०७, १०९, १०८, १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत समज देण्यात आली. याच अनुषंगाने पाच दिवसांपूर्वी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे.

Web Title: Controversial posts on social media Action against 42 persons by Beed police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.