वसई-विरारमध्ये भाजपच्या नव्या ‘ऑपरेशन’ची चर्चा; ‘बविआ’च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:03 IST2026-01-18T06:02:21+5:302026-01-18T06:03:35+5:30
भाजपने जर हे ऑपरेशन यशस्वी केले, तर वसई- विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसेल.

वसई-विरारमध्ये भाजपच्या नव्या ‘ऑपरेशन’ची चर्चा; ‘बविआ’च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता
वसई-विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या निकालात ‘बविआ’ने मिळवलेल्या एकहाती सत्तेमुळे हा निकाल राज्यात महत्त्वाचा ठरला. राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या आणि बहुतांश महापालिकांत सत्ता मिळवलेल्या भाजपला वसई-विरार महापालिकेमध्ये मात्र तीन आमदार असूनही सत्ता मिळवता आली नाही. परंतु, ‘बविआ’च्या विजयाचा गुलाल धूसर होण्याआधीच वसईच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोट्स’च्या हालचालींनी खळबळ उडवून दिली आहे.
वसई-विरार महापालिका निवडणूक ११५ जागांसाठी झाली. बहुमतासाठी आवश्यक असलेला ५८ चा आकडा ओलांडून ‘बविआ’ने ७१ जागांवर विजय मिळवला खरा; पण भाजप आता पडद्याआड मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. भाजपला ४४ जागा मिळालेल्या असल्या तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ४४ जागांवरून थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष रणनीती आखत आहे. ‘बविआ’चे १५ ते १६ नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आल्याचे सांगितले जात असल्याने, पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात न अडकता आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन होण्याचा यांचा मानस असल्याचे कळते.
हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला आव्हान
गेली अनेक दशके वसई-विरारवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.‘बविआ’चा बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी ठाकूर आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपने जर हे ऑपरेशन यशस्वी केले, तर वसई- विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसेल.