चिठ्ठीत ‘सॉरी पप्पा’ लिहून ३ बहिणींची आत्महत्या; कारण ऐकताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:51 IST2026-02-05T07:49:54+5:302026-02-05T07:51:54+5:30
Ghaziabad Three sisters suicide: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एकाच वेळी तीन बहिणींनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

चिठ्ठीत ‘सॉरी पप्पा’ लिहून ३ बहिणींची आत्महत्या; कारण ऐकताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली
गाझियाबादमध्ये बुधवारी पहाटे एका इमारतीतील नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून तीन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. मुलींना मोबाइलवर कोरियन ऑनलाइन गेम सतत खेळण्याची सवय होती. त्यावर पालकांनी बंधन आणल्यामुळे बहिणींनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे.
साहिबाबाद परिसरात भारत सिटीमधील एका इमारतीत नवव्या मजल्यावर राहणाऱ्या चेतनकुमार यांच्या मुली निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्या होत्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोरोना काळात त्यांना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले. त्या सतत एकत्रित कोरियन गेम खेळत असत. दोन वर्षांपासून शाळेत गेल्या नव्हत्या.
चिठ्ठीत लिहिले ‘सॉरी पप्पा’
या मुलींनी एका चिठ्ठीत लिहिले होते की, आमच्या डायरीत लिहिलेले सर्व वाचा, त्यातून तुम्हाला नीट माहिती कळेल. या चिठ्ठीत रडणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी आणि ‘सॉरी पप्पा, आम्हाला माफ करा’ असा हस्तलिखित संदेश होता.