भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुती समन्वय समितीची पहिली बैठक निष्फळ
By धीरज परब | Updated: December 26, 2025 22:32 IST2025-12-26T22:28:22+5:302025-12-26T22:32:00+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये महायुतीचे जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यास भाजपा कडून नकार देत ठाणे पॅटर्न बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करू असे शिंदेसेनेस सांगण्यात आले.

भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुती समन्वय समितीची पहिली बैठक निष्फळ
- धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुती समन्वय समितीची पहिली बैठक शुक्रवारी रात्री मीरारोडच्या भाजपा कार्यालयात झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये महायुतीचे जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यास भाजपा कडून नकार देत ठाणे पॅटर्न बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करू असे शिंदेसेनेस सांगण्यात आले.
मीरा भाईंदर महापालिकेत युती व्हावी ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकी नंतर चव्हाण यांनी समन्वय समिती गठीत केली. चव्हाण यांनी युतीच्या चर्चेसाठी समिती गठीत केली असताना दुसरीकडे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी युती नको असे सांगत ९९ टक्के युती होणार नाही असे म्हटले होते. तर समितीची बैठक व्ह्याच्या आधीच शुक्रवारी दुपारी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात सेनेला युती करायची असेल तर २१ जागांवरच चर्चा करावी, आमचे कार्यकर्ते परत पक्षात पाठवावे आणि शिवार उद्यान येथील टाऊनपार्क आरक्षण मधील लग्नाचा हॉल काढून मोकळे करावे अश्या अटी जाहीरपणे ठेवल्या. इतकेच काय तर शिवसेना भाजपच्या पाठिंब्या शिवाय जागा जिंकू शकत नाही पण भाजपाला सेनेची गरज नाही असे म्हटले होते.
तोच शुक्रवारी रात्री समन्वय समितीच्या बैठकीसाठी मंत्री सरनाईक हे जिल्हा प्रमुख राजू भोईर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रमप्रताप सिंह हे मीरारोड येथील भाजपा कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यावेळी आ. मेहता हे बाहेर होते व तब्बल ३५ - ४० मिनिटांनी आले. तो पर्यंत मंत्री सरनाईक यांना आ. मेहतांची वाट बघत बसावे लागले. बैठकीसाठी आल्यावर आ. मेहतांनी मंत्री यांना थांबायला लागले म्हणून दिलगिरी देखील व्यक्त केली.
बैठकीत भाजपा कडून आ. मेहता सह जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास ह्या समिती सदस्य व्यतिरिक्त माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते. आ. मेहतांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले.
बैठकीत मंत्री सरनाईक यांनी युतीच्या आवश्यकते बद्दल बोलत ठाण्या मध्ये १३० पैकी आमचे ८२ व भाजपाचे २४ नगरसेवक असून तेथे आमचा पक्ष मोठा आहे तरी आम्ही युती केली आहे. ठाण्यात सेना भाजपात जमू शकते तर इकडे का नाही. आम्ही ठाण्यात मोठे मन दाखवले तसे मीरा भाईंदर मध्ये तुम्ही पण मोठे मन ठेवा आणि ठाण्याच्या धर्तीवर युती व जागा वाटप करा असा प्रस्ताव मंत्री सरनाईक यांनी दिला. ठाण्याच्या फॉर्म्युला प्रमाणे मीरा भाईंदर मध्ये शिंदे सेनेला महायुती मध्ये ३७ जागा बसतात.
ठाणे फॉर्म्युला बाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कडे चर्चा करू अशी भूमिका भाजपाने घेतली. आ. मेहता यांनी त्यांच्या कडील प्रत्येक प्रभाग व जागा निहाय कोण उमेदवार निवडून येऊ शकतो याची तयार केलीली माहिती मंत्री सरनाईक यांना दाखवली. त्यात तुमचे सेनेचे अनेक माजी नगरसेवक पराभूत होणार असल्याचा दावा केला गेला. मेहतांच्या सादर आकडेवारी वरून सेना केवळ १३ जागाच जिंकणार असल्याचे भाकीत यावेळी वर्तवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळपास अर्ध्या तासा नंतर बैठक आटोपती घेण्यात आली. दोन्ही नेत्यांनी प्राथमिक चर्चा झाली असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हातात असल्याने त्यात पुढे चर्चा होईल असे दोन्ही नेत्यांनी माध्यमांना सांगितले.