अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 20:55 IST2026-01-12T20:54:52+5:302026-01-12T20:55:48+5:30
महाराष्ट्रात इतक्या निवडणुका झाल्या पण अशी निवडणूक पाहिली नाही. काही लगामच नाही. बिनधास्त जे काही हवे ते करायचे असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
ठाणे - तुम्ही जर विकास केलाय असं सांगता, मग लोकांना पैसे वाटण्याची वेळ का आली? अर्ज मागे घेण्यासाठी सोलापूरात आमच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षाचा खून केला. पोलीस हताश झालेत. ५-५ हजाराला मते विकली जातायेत. उमेदवारांना पैशांची ऑफर देऊन अर्ज मागे घ्यायला लावले. डोंबिवलीत शैलेश धात्रक आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांना मिळून १५ कोटींची ऑफर दिली. मात्र १५ कोटी ऑफर नाकारून ते निवडणुकीत उभे राहिले. ठाण्यात ५ कोटींची ऑफर नाकारणारी आमची उमेदवार राजश्री नाईक, हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा-शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात कुणाला ५ कोटी, १५ कोटी, २ कोटी आणि १ कोटी इतका पैसा ओतला जात आहे. महाराष्ट्रात इतक्या निवडणुका झाल्या पण अशी निवडणूक पाहिली नाही. काही लगामच नाही. बिनधास्त जे काही हवे ते करायचे. कोर्टात जा, पोलिसांत जा कुठेही जाऊन उपयोग नाही. फक्त आमची मर्जी चालणार असा प्रकार सुरू आहे. बदलापूरच्या मुख्य आरोपीला ठार मारले, त्यातला सह आरोपी होता त्याला भाजपाने स्वीकृत नगरसेवक बनवले. मनसेने मोर्चाची हाक दिली त्यानंतर त्या माणसाने स्वत: राजीनामा दिला. लोकांना गृहित धरले जाते. ५-५ हजार तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही हिंमत आली कुठून असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच देवेंद्र फडणवीस यांना काय झालंय, माहिती नाही. पहिला हा माणूस बरा वाटायचा, पण आता काय झालंय माहिती नाही. भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही करताय, ज्या भुजबळांना तुम्ही जेलमध्ये टाकले त्यांनाच घेऊन तुम्ही सरकार बनवले. सतत खोटे बोलत राहायचे. किती खोटे बोलायचे. अन्नामलाई बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही असं विधान केले तरी तो असं बोललाच नाही असं सांगत होते. मी गौतम अदानीचे प्रकरण काढले आणि मिरच्या झोंबल्या. माझ्या घरी गौतम अदानी, रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा सगळेच येऊन गेलेत. घरी आले म्हणून त्यांची पापे झाकायची का असं सांगत राज ठाकरे यांनी भाजपाच्या आरोपांवर पलटवार केला.
दरम्यान, ज्या वेळी महाराष्ट्रावर, मुंबईवर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगेरे काही बघणार नाही. मी जे सांगितले ते गांभीर्याने घ्या. जो व्यक्ती सिमेंट व्यवसायात नव्हता तो आता २ नंबरचा सिमेंट व्यावसायिक आहे. देशातील ६-७ विमानतळे अदानींना दिलेत. नवी मुंबईचं विमानतळ अदानींनी बांधले आणि बाकीचे विमानतळे गन पाँईटवर अदानींनी घेतली. एक विमानतळ, एक पोर्ट सोडून अदानींकडे काही नव्हते. फक्त केंद्राचा दबाव आणि नरेंद्र मोदींचं नाव यावर हा माणूस देशभरात पसरला. पोर्ट बंद झाली, व्यापार ठप्प, जर वीज बंद केली तर तुम्ही सगळे अंधारात...तक्रार कोणाकडे करायची असंही राज ठाकरेंनी जनतेला विचारले.
एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का?
इंडिगोची विमाने बंद होती, ६५ टक्के हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिली आहेत. त्याने बंद केले, कारणे काही दिली नाही. विमान सेवा बंद झाल्यावर माणसांचे हाल झाले. अख्खा देश ठप्प झाले. एक विमान कंपनी देश ठप्प करू शकते. आज अदानींकडे वीज, पोर्ट, विमानतळे, लोखंडाचा व्यापार, सिमेंट व्यापार हे सगळे आहे. उद्या जर सिमेंटचे दर वाढले तुमच्या घरांच्या किंमती वाढणार. फक्त एक व्यक्ती १० वर्षात इतका मोठा होतो. रतन टाटा, बिर्ला या उद्योगपतींना ५०-१०० वर्ष लागली परंतु जगात इतक्या झपाट्याने श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी...या देशात उद्योगपती मोठे व्हावेत. मी कुणाचा दुश्मन नाही परंतु सगळे उद्योगपती मोठे व्हावेत. देशात रोजगार आले पाहिजे, उद्योग आले पाहिजे. मी उद्योगपतीच्या विरोधातला नाही पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का हे विचारणारा मी माणूस आहे असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.