सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला
By नितीन पंडित | Updated: May 6, 2024 22:50 IST2024-05-06T22:48:35+5:302024-05-06T22:50:21+5:30
उद्धव ठाकरेंकडून मोदींची प्रशंसा केल्याची ऑडिओ क्लिप आज शिंदे यांनी व्यासपीठावर ऐकवली

सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या. सगळे आमदार, महापौर, नगरसेवक हे तुम्हाला निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. तुम्ही खासदार झाल्यावर या सर्वांना ताकत द्या, असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना दिला आहे. पाटील यांच्या भिवंडी लोकसभेत असलेल्या एकहाती सत्ता समीकरणावर शिंदे यांनी कानपिचक्या लगावत, कार्यकर्त्यांना सांभाळा, असा सल्लाही दिला. पाटलांवर भिवंडी लोकसभेत असलेली नाराजी या निमित्ताने समोर आली असल्याचे बोलले जात आहे.
फेसबुक लाईव्ह करून व घरात बसून राज्य चालवता येत नाही, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी आधी मोदींची प्रशंसा केल्याची ऑडिओ क्लिप शिंदे यांनी व्यासपीठावर ऐकवली आणि सरडे रंग बदलणारे पाहिले, मात्र एवढा लवकर रंग बदलणारा सरडा कुणी पहिला का? अशी टीका केली.