आपल्याच उमेदावाराला म्हणाले 'चारित्र्यहीन'; शरद पवार गटाचे शहराध्यक्ष काय बोलून गेले (Video)

By अजित मांडके | Published: April 4, 2024 04:37 PM2024-04-04T16:37:43+5:302024-04-04T16:41:27+5:30

महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता

He called his own candidate 'characterless'; What did the city president of NCP Sharad Pawar group said watch viral Video | आपल्याच उमेदावाराला म्हणाले 'चारित्र्यहीन'; शरद पवार गटाचे शहराध्यक्ष काय बोलून गेले (Video)

आपल्याच उमेदावाराला म्हणाले 'चारित्र्यहीन'; शरद पवार गटाचे शहराध्यक्ष काय बोलून गेले (Video)

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे लोकसभा मतदार संघात सध्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. दोनही गटाकडून सध्या मेळाव्यांचा धडाडा सुरु झाला आहे. त्यात आरोप प्रत्यारोप, कोपरखळ्या सुरु असतांनाच महाविकास आघाडीच्या ठाण्यातील मेळाव्यात उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे हे निष्ठावंत आणि चारीत्रवान म्हणण्याऐवजी चारीत्रहीन उमेदवार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांच्या तोडून निघाल्याने आता त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून सध्या हे वक्तव्य वाऱ्यासारखे सोशल मिडियावर वायरल झाले आहे. राजकीय नेत्यांकडून भाषण करतांना अनेकदा बोलण्याच्या नादात वादग्रस्त विधाने कळत नकळत निघत असतात, त्या वक्तव्यावर नंतर सारवासारव केली जाते.

येत्या 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने ठाणे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला. मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास विलंब होताना दिसत आहे. महाविकास आघाडीने उमेदवाराचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महायुतीने उमेदवारशिवाय मेळावे घेण्यास प्रारंभ केले आहे.

महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. मात्र सुदैवाने यावेळी उमेदवार विचारे हे उपस्थित नव्हते. याप्रसंगी बोलताना, देसाई यांनी मी उमेदवार राजन विचारे आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहे. शरद पवार यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली. तसेच माझे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निष्ठेने मला ही जबाबदारी दिली आहे. तसेच इंडिया आघाडीने जो नेता उमेदवार म्हणून दिला आहे. तो निष्ठावान आणि चारित्र्यहीन असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन मेळाव्यात एकच हशा पिकल्याचे दिसून आले. त्यावर त्यांना उपस्थित नेत्यांनी चारित्र्यवान म्हणा असे सांगितले. त्यानंतरही तेच ते म्हणत पुन्हा भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडून चारित्र्यहीन असा शब्द प्रयोग झाल्याचे दिसून आले. परंतु त्यांचे हे वादग्रस्त विधान सध्या चांगलेच ट्रोल झाले.

सोशल मिडियावर तर त्यांच्या व्हिडीओने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. प्रचार करणारे असे नेते असतील तर उमेदवार कसा निवडून येणार अशा शब्दात खडे बोल सोशल मिडियावर सुनावले जात आहेत. तिकडे महायुतीच्या मेळाव्यातही देसाई यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली आहे. ज्यांना बोलायला येत नाही, ते काय उमेदवार निवडून आणणार असा सवालही महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.

Web Title: He called his own candidate 'characterless'; What did the city president of NCP Sharad Pawar group said watch viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.