चंद्रपूरचा वचपा भिवंडीत; काँग्रेसचा ‘दे धक्का’ : उपमहापौरपदाच्या उमेदवारासह भाजपचे ६ नगरसेवक फुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 05:23 IST2026-02-21T05:19:50+5:302026-02-21T05:23:35+5:30
भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौर, उपमहापौरपदी तारिक मोमीन

चंद्रपूरचा वचपा भिवंडीत; काँग्रेसचा ‘दे धक्का’ : उपमहापौरपदाच्या उमेदवारासह भाजपचे ६ नगरसेवक फुटले
भिवंडी : भाजपमधून फुटून बाहेर पडलेल्या सहा नगरसेवकांच्या गटाचे नेते व काँग्रेसप्रणीत सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांनी ४८ मते मिळवित शुक्रवारी महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन ४३ मते मिळवून विजयी झाले. त्यामुळे भिवंडीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या स्नेहा पाटील यांना केवळ १६ मते मिळाली.
सेक्युलर फ्रंट, भाजप व शिंदेसेना अशी तिरंगी लढत झाली. शिंदेसेनेचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. कोणार्क विकास आघाडीचे ४ नगरसेवक निवडून आले. त्यांचे प्रमुख विलास पाटील महापौरपदासाठी उत्सुक होते. त्यांना शिंदेसेनेचाही पाठिंबा होता. याच काळात विलास पाटील यांना जमीन व्यवहार आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक झाली. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. पाटील महापौर होऊ नयेत असे भाजपचे स्पष्ट मत होते. विलास पाटील यांना शिंदेसेनेच्या १२, कोणार्क विकास आघाडीच्या ४, भिवंडी विकास आघाडीच्या ३ आणि समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांनी मतदान केले.
पक्षीय बलाबल
काँग्रेस : ३०
राष्ट्रवादी (शरद पवार) : १२
समाजवादी : ६
भाजप : २२
शिंदेसेना : १२
कोणार्क विकास आघाडी : ४
भिवंडी विकास आघाडी : ३
अपक्ष : १
...अन् गणितेच बदलली
महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडल्याने काँग्रेस प्रणीत सेक्युलर फ्रंटचा महापौर झाला. विशेष म्हणजे भाजपने महापौरपदाचे बदललेले उमेदवार नारायण चौधरी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार सुहास नकाते फुटल्याने निवडणुकीची गणितेच बदलून गेली. मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मनपा मुख्यालयासमोर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजपवाले लोकांना एक-दुसऱ्यापासून तोडणारे आहेत. आम्ही एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा सेक्युलर विचारधारेचा व भिवंडीतील सर्व जनतेचा विजय आहे. शहर
विकासासाठीच नारायण चौधरी सेक्युलर फ्रंटसोबत आले.
खा. सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी (शरद पवार)
नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौर आहेत. आतापर्यंत काँग्रेस, समाजवादी पक्ष भाजपकडून फोडण्यात येत होते. मात्र, पहिल्यांदाच भाजपमध्ये फूट पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांचा सेक्युलर फ्रंटला पाठिंबा आहे.
आ. रईस शेख, सपा
मी आज कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही. मी शहराच्या विकासासाठीच सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झालो आहे. आजपासून मी केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच बोलणार व शहराचा विकास करणार.
नारायण चौधरी, निर्वाचित महापौर
शहराचा विकास करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य व ध्येय असणार आहे. भिवंडीतील जनतेने मला निवडून दिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
तारिक मोमीन, नवनिर्वाचित उपमहापौर
काेणाला पडली किती मते? : भाजपने तीन दिवसांपूर्वी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर चौधरी यांना सेक्युलर फ्रंटकडून उमेदवारी देण्यात आली. तसा व्हिप काँग्रेसने काढला होता. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झाले. माेमीन यांना ४३, भाजपचे सुहास नकाते यांना २१, शिंदेसेनेचे जावेद दळवी यांना २५ मते मिळाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.