उल्हासनगर महापालिकेतील भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवक 'नॉटरिचेबल'; फोडाफोडीच्या भीतीने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:17 IST2026-01-23T18:16:50+5:302026-01-23T18:17:48+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीत भाजप व शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. ऐकून ७८ पैकी भाजपने ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले.

उल्हासनगर महापालिकेतील भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवक 'नॉटरिचेबल'; फोडाफोडीच्या भीतीने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू!
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता भाजप आणि शिंदेसेनेत 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे नगरसेवक फुटू नयेत यासाठी दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जात असून, बहुतांश नगरसेवक सध्या 'नॉटरिचेबल' झाले आहेत. पक्षप्रमुखांनी या नगरसेवकांना शहराबाहेर सुरक्षित स्थळी हलवल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीत भाजप व शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. ऐकून ७८ पैकी भाजपने ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. सत्तेसाठी ४० हा आकडा गाठणे अनिवार्य आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता कोणाकडेही स्वबळावर बहुमत नाही. भाजपपेक्षा एक जागा कमी असूनही शिंदेसेनेने अत्यंत वेगाने हालचाली करत बहुमताचा टप्पा ओलांडल्याचा दावा केला. शिंदेसेनेला वंचित बहुजन आघाडीचे-०२, साई पक्षाचा-०१ व अपक्ष-०१ या चार नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिंदेसेनेचा आकडा ४० वर पोहोचला असून त्यांनी मॅजिक फिगर गाठली आहे. यामुळे भाजप गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
नगरसेवकांवर 'वॉच' आणि नेत्यांची फिल्डिंग
शिंदेसेनेने आपला महापौर बसवण्यासाठी कंबर कसली असून खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्यावर नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपचा महायुतीवर विश्वास दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मात्र महापालिकेत महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा त्यांनी केला. मात्र भाजप देखील आपला आकडा जुळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा शिरकाव
उल्हासनगरच्या राजकारणात आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा शिरकाव झाला असून ऐन महापौर निवडीच्या तोंडावर कोणता नगरसेवक कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्यास्थित सर्वच नगरसेवक जनतेला देवभरोसे सोडून रिसॉर्ट मध्ये आनंद लुटत आहेत.