स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला. प्रत्येक कलाकारासाठी सुरु होणारा नवा प्रोजेक्ट हा खुपच स्पेशल असतो.

मोलकरीण बाईच्या संपूर्ण टीमच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. दिवसाचे बारा-तेरा तास सेटवर एकत्र असल्यामुळे या कलाकारांमध्ये जिव्हाळ्याचे नाते बनले आहे. त्यामुळेच मालिकेचा पहिला एपिसोड एकत्र पाहत या कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केले.

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितके सुखकर होते तितकेच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग.

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारे हृदयस्पर्शी नाते या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अशा स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील.

आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी 'मोलकरीण बाई' ही मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: For the purpose of the entire team of 'Mokharin Bai', this is the reason for celebration of celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.