Limitations on television have to be handled - Shashank Ketkar! | Interview : टेलिव्हिजनवर मर्यादा सांभाळाव्या लागतात -शशांक केतकर!
Interview : टेलिव्हिजनवर मर्यादा सांभाळाव्या लागतात -शशांक केतकर!

-रवींद्र मोरे
विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता शशांक केतकर सध्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत सिद्धार्थची भूमिका साकारताना दिसत आहे. ही भूमिका तसेच आतापर्यंतच्या त्याच्या अभिनय प्रवासाबाबत शशांकशी ‘सीएनक्स’ने साधलेला हा संवाद...

* या मालिकेतील सिद्धार्थच्या भूमिकेबद्दल काय सांगशील ?
- मालिकेत सिद्धार्थ तत्ववादी नावाचं कॅरेक्टर आहे जे एका श्रीमंत कुटुंबामधलं आहे. आई आहे, वडील गेलेले आहेत. काका, काकू, आजी, आजोबा आणि मोठी बहीण देखील आहे. असे एक छान कुटुंब आहे. या कुटुंबात मला एवढा परफेक्ट दाखविला आहे की ज्याला कधीही दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली नाही. एवढेच नव्हे तर शाळेत वापरल्यानंतर मोठ्या बहिणीचे पुस्तकेही कधी मला दिलेले नाहीत. त्यातच एका चाळीत राहणारे दुसरे मध्यमवर्गीय दीक्षित कुटुंब आहे ज्या कुटुबांत अनुश्री दीक्षित नावाची मुलगी आहे आणि दुर्दैवाने ती विधवा आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी ही मुलगी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाची असून तिची आणि माझी भेट होते आणि मी तिच्या प्रेमात पडतो. मात्र ती मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधीत आणि विधवा असल्याने माझी आई या नात्याला विरोध दर्शविते.

* सिद्धार्थ आणि शशांकमध्ये काय साम्य आहे?
- दोघेही स्विमर आहेत. या मालिकेतील सिद्धार्थ हा नॅशनल स्विमर आहे आणि मी स्वत: देखील नॅशनल स्विमर आहे. शिवाय सिद्धार्थचे जसे आईवर प्रेम आहे तसेच शशांकचेही आईवर खूप प्रेम आहे, नाती जपणारा आहे. सिद्धार्थ जसा भावनिक आणि प्रॅक्टिकल आहे तसाच शशांक ही रिअल लाईफमध्ये आहे. एवढे साम्य आहे, मात्र मी गमतीत असे म्हणतो की, दोघांत एकच फरक आहे की, सिद्धार्थची ७० कोटी प्रॉपर्टी आहे आणि माझी ७० लाखाची पण नाहीय.

* सिद्धार्थची भूमिका करताना कोणती आव्हानं येत आहेत?
-  या अगोदर जी मालिका केली होती त्यातील कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर हे सारखेच आहे.  त्यामुळे आम्हाला एकच भीती होती की, आधीच्याच कॅरेक्टरसारखे होईल की काय. त्यामुळे ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी कटाक्षाणं टाळायचं आहे आणि ते आम्ही टाळत आलोय आणि म्हणून प्रेक्षकांकडून खूप कौतुकही होत आहे की, दोघं कॅरेक्टर्स खूप वेगवेगळे वठविले आहेत. माझ्यासमोर पहिल्या कॅरेक्टरमधून बाहेर निघून हे कॅरेक्टर साकारणं हेच खरं मोठं आवाहन होतं.

* वंदना गुप्ते यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?
- धमाल, सेटवरची सर्वात खोळकर जी कोणी व्यक्ती असेल तर त्या वंदना गुप्ते. त्या सिनियर नक्कीच आहेत. मात्र सर्वात जी कोणी थट्टा मस्करी करत असेल ती त्या आहेत. त्यांच्याकडून शिकावं तेवढं कमीच आहे. माणसं जोडण्यापासून कामावरची कमांड शिवाय काम करुन घेणं हे कौशल्य त्यांच्यात अविरत आहे.

* मालिकांकडे प्रेक्षकांना वळविण्यासाठी अजून काय नाविण्यता पाहिजे?
- टेलिव्हिजनला काही मर्यादा असतात. टेलिव्हिजनचे प्रेक्षक हे अगदी लहान बालकापासून ते आजी आजोबापर्यंत असतात. त्यामुळे त्याच्या मर्यादा सांभाळून आपल्याला प्रेझेंट करावे लागते. आपली संस्कृति, आपल्या लोकांची आवड हे सर्व पाहावे लागते. शिवाय मी आजच्या पिढीतला अ‍ॅक्टर आहे. त्यामुळे मलाही अर्थात टेलिव्हिजनच्या फॉर्मेटमधल्या काही गोष्टी खटकतात. एकीकडे जग आधुनिक होत आहे, आणि दुसरीकडे टेलिव्हिजनवरच्या मर्यादा. कदाचित हे आगामी काळात बदलू शकते.

Web Title:  Limitations on television have to be handled - Shashank Ketkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.