ठळक मुद्देबिग बॉस 13 मध्ये बेड फ्रेन्ड्स फॉरएव्हर या थीममुळे वाद सुरु झाला.

पूर्वापार वादग्रस्त राहिलेल्या ‘बिग बॉस’चे यंदाचे 13 वे सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरतेय. काही आठवड्यांपूर्वी हा शो सुरू झाला आणि पहिल्याच आठवड्यात या शोबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. आता तर हा शो बंद करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. करणी सेनेनेही जोरकसपणे ही मागणी करत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर या शोवर बंदी आणावी अशी मागणी अनेकांकडून होतेय. हा शो अश्लीलतेला आणि लव्ह जिहादला खतपाणी घालतोय असा अनेकांचा आक्षेप आहे. विरोधाचे हे सूर बघता, माहिती व प्रसारण मंत्रालय या शोवर करडी नजर ठेवणार असल्याचे कळतेय
 माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस 13’चे प्रसारण बंद करावे अशी मागणी करणारे पत्र आम्हास प्राप्त आहे आणि माझे खाते ते जे काय दाखवत आहेत ते आक्षेपार्ह आहे का,याचा अभ्यास करून येत्या दिवसात अहवाल देतील, असे त्यांनी सांगितले. 

मागच्या काही दिवसांपासून ट्विटरवर  #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एवढंच नाही तर अनेकजण सलमान खानला ब्लॉक करुन त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करतना दिसत आहेत. काल सलमानच्या मुंबई येथील राहत्या घराबाहेर करणी सेनेने निदर्शने केलीत.

करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित हा शो बंद करण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस 13 मध्ये काश्मीरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे.  हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात, असा निष्कर्ष यातून निघतो. सरकारने या मुद्यावर तातडीने निर्णय घेत, हा शो त्वरित बंद करावा, ’असे करणी सेनेने या पत्रात म्हटले होते. भाजपा खासदार नंदकिशोर गुर्जर यांनीही प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 13’ हा शो बंद करण्याची मागणी पुढे रेटली होती.

यामुळे विरोध
बिग बॉस 13 मध्ये बेड फ्रेन्ड्स फॉरएव्हर या थीममुळे वाद सुरु झाला. या बिग बॉसच्या घरातील महिला स्पर्धकाना पुरूषांसोबत बेड शेअर करणे बंधनकारक होते. याला लोकांनी जोरदार विरोध केला. विरोध वाढताना पाहून बिग बॉसने हा नियम बदलवला. आता कुठलाही स्पर्धक कुणासोबतही बेड शेअर करू शकतो. यानंतर ‘माऊथ टू माऊथ’ म्हणजे हातांचा वापर न करताना केवळ तोंडाने सामग्री पास करण्याचा या शोमधील एक टास्कही वादाच्या भोव-यात सापडला होता. फेस टू फेस नॉमिनेशनलाही लोकांनी विरोध केला आहे.
  
  


Web Title: information and broadcasting minister prakash javadekar on salman khan bigg boss 13 ban
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.