ठळक मुद्देया मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे.

दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिकेचा वाद तूर्तास चिघळण्याची चिन्हे आहेत. मालिकेत विसंगत चित्रीकरण दाखवले जात असल्याचा जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांचा आक्षेप आहे. आता या ग्रामस्थ व पुजा-यांनी पुन्हा एकदा या मालिकेविरोधात एकत्र येत, आपली मागणी पुढे रेटली आहे. ज्योतिबा देवाचे महात्म्य सांगणारे संदर्भ ग्रंथ घेऊन, मालिकेचे चित्रीकरण करा, अन्यथा मालिका बंद करा, अशी मागणी या सर्वांनी केली आहे.  मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही या ग्रामस्थ पुजा-यांनी पुढे रेटली आहे.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामस्थ व पुजा-यांची  बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने  मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीला सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळ, विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, गावकरी आदी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना पूजारी म्हणाले, यापूर्वी आम्ही मालिकेवर आक्षेप नोंदवला होता. त्यावेळी कोठारे व्हिजनसोबत सविस्तर चर्चा झाली होती. ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक अभ्यासक, संशोधन, गावक-यांना  लेखन व मालिकेचे भाग दाखवून ती प्रसारित केली जाईल, अशी ग्वाही महेश कोठारे यांनी स्वत: दिली होती. पण त्यांनी हा शब्द पाळला नाही. देवी देवतांना एकेरी उल्लेख, देवाच्या पायात चप्पल, केदारनाथाचा जन्म हे सर्व चुकीचे दाखवण्यात आले. यावेळी समस्त गावकरी व पुजा-यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या समक्ष मालिकेच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

याआधी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत ही मालिका त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थ व पुजा-यांनी केली होती. जोतिबा मंदिरापुढे निदर्शने करत, जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांनी जोतिबाचे सरपंच राधा बुणे यांच्याकडे निवेदन सोपवले होते.   सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला होता.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यावर सुरुवातीला ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. जोतिबाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला कळेल, जोतिबाची महती घरोघरी पोहोचेल, याबद्दल सगळेच आनंदात होते. प्रत्यक्षात मालिका सुरु झाल्यानंतर मात्र ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला. मालिकेत अनेक चुकीच्या घटना असल्याचा आरोप गुरव समाजातील पुजा-यांनी केला आहे. हा प्रकार जोतिबा भक्तांच्या भावना दुखावणारा असल्याचा आरोपही पुजा-यांनी केला आहे.

या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. विशालने याआधी ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत तर  मिथुन  आणि  धुमस  या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा! कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dakkhancha raja jotiba tv serial should be stopped priests demands kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.