ठळक मुद्देनिवेदिता सराफ यांना आशा भोसले यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्याबद्दल सध्या निवेदिता खूपच खूश आहेत. आशा ताईंनी केलेल्या कौतुकामुळे निवेदिता भारावून गेल्या आहेत.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

अभिजित आणि आसावरीच्या लग्न सोहळ्यानंतर तर प्रेक्षकांना अग्गंबाई सासूबाई या मालिकेचे कथानक प्रचंड आवडत आहे. या मालिकेत एक वेगळा विचार मांडण्यात आला असल्याने या मालिकेचे नेहमीच कौतुक केले जाते. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ गायिका या मालिकेच्या फॅन असून त्या न चुकता या मालिकेचे सगळे भाग पाहातात. त्यांना या मालिकेतील आसावरीची व्यक्तिरेखा प्रचंड आवडते.

आसावरी या व्यक्तिरेखेने महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांचे मन जिंकले आहे. आई, सून आणि सासू अशी प्रत्येक भूमिका अतिशय चोखपणे बजावणाऱ्या आसावरीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षकांना आता ती आपल्या घरातीलच एक सदस्य वाटू लागली आहे. आसावरी ही भूमिका या मालिकेत निवेदिता सराफ साकारत असून या मालिकेतील भूमिकेसाठी चक्क ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी निवेदिता सराफ यांचे कौतुक केले आहे.

निवेदिता सराफ यांना आशा भोसले यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्याबद्दल सध्या निवेदिता खूपच खूश आहेत. आशा ताईंनी केलेल्या कौतुकामुळे निवेदिता भारावून गेल्या आहेत. मी तुझी मालिका दररोज पाहाते, तू खूपच छान अभिनय करते असे आशा ताई यांनी त्यांना सांगितले. 

या भूमिकेबद्दल बोलताना निवेदिता सराफ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, "अग्गंबाई सासूबाईच्या गोष्टीतच वेगळेपणा आहे. मुळात माझ्या वयाशी साधर्म्य साधणारी एक स्त्री एका डेली सोपची नायिका असू शकते हा विचारच धाडसी होता. मला ‘आसावरी’ तिच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी भेटली, पण त्याआधी तिचं ५० वर्षांचं आयुष्य कशा पद्धतीने तिने घालवलं असेल याचं एक कॅरेक्टर स्केच मी तयार केलं आणि तिचा स्वभाव अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला. मी या आधी निभावलेल्या भूमिकांसाठी भरपूर मेकअप, केसांना जड गंगावनं, भरपूर नक्षीकाम असलेला पदर आणि तोही डोक्यावरून अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत. या सगळ्यामुळे मला आता ‘आसावरी’ जास्त सोपी वाटते आणि आवडते. त्यात मेकअप नाही, भारी कपडे नाहीत, दागदागिने नाहीत. त्यामुळे सगळं अगदी छान सहज सुरू आहे."

Web Title: asha bhosale is a big fan of agga bai sasubai serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.