Google Maps ने दिला दगा; आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले, स्थानिकांनी चोर समजले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:45 IST2025-01-09T15:44:55+5:302025-01-09T15:45:39+5:30
Google Map Wrong Route :गेल्या काही काळापासून Google Maps ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.

Google Maps ने दिला दगा; आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले, स्थानिकांनी चोर समजले...
Google Map Wrong Route : गेल्या काही काळापासून Google Map ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अपघात किंवा एखादं कुटुंब भलत्याच ठिकाणी पोहल्याची घटना घडली आहे. आता या गुगल मॅपमुळे आसामपोलिस मोठ्या अडचणीत आले. मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले. तिथे स्थानिकांनी रात्रभर पोलिसांना ओलीस ठेवले. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला अन् स्वतःची सुटका करुन घेतली.त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
नेमकं काय घडलं?
आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील पोलीस आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकत होते. या टीममध्ये एकूण 16 पोलिस होते, त्यापैकी फक्त 3 पोलिस गणवेशात होते, तर बाकीचे सिव्हिल ड्रेस घातलेले होते. रात्री पोलीस गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गाने निघाले, पण चुकून ही टीम आसामची सीमा ओलांडून नागालँडच्या हद्दीत शिरला.
स्थानिकांना झाला गैरसमज
पोलिसांच्या पथकाकडे अनेक आधुनिक शस्त्रेही होती. रात्रीच्या अंधारात ते नागालँडला पोहोचले, तेव्हा काही स्थानिकांना त्यांच्यावर संशय आला. शस्त्रे पाहून त्यांनी पोलिसांना चोर-दरोडेखोर समजून पकडले. स्थानिकांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला. अखेर स्थानिकांनी त्यांना पकडले अन् रात्रभर ओलीस ठेवले.
स्थानिक पोलिसांनी केली सुटका
अडचणीत सापडलेल्या पोलिसांनी नागालँडच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. यानंतर स्थानिक प्रशासनाने आणखी एक पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन लोकांना समजावून सांगितल्यावरच त्यांनी आसाम पोलिसांच्या पथकाला सोडून दिले. यानंतर जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.