धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी

By राकेश कदम | Published: March 27, 2024 12:36 PM2024-03-27T12:36:27+5:302024-03-27T12:43:00+5:30

धैर्यशील माेहिते-पाटील शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता

Dhairyasheel Mohite Patil supporters set NCP Symbol man blowing tutari as DP so he may join Sharad Pawar group | धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी

धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी

राकेश कदम, साेलापूर: माढा लाेकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार बदलणार नाही. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ अकलूज येथूनच करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला. दुसरीकडे अकलूज, साेलापूरमधील माेहिते-पाटील समर्थकांनी आपल्या साेशल मिडीयाच्या ‘डिपी’वर तुतारी चिन्हाचे फाेटाे लावून बंडाचे संकेत दिले आहे. माेहिते-पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर बुधवारी पुन्हा कार्यकर्ते जमू लागले. आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील यांचे बंधू धैर्यशील माेहिते-पाटील बुधवारी किंवा गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतील, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. 

भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील, फलटणमधील राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांची विराेध केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी अकलूजमध्ये येउन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहिते-पाटील यांची भेट घेतली हाेती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तर रामराजे यांच्यासाेबत बैठक घेतली हाेती. तरीही दाेन्ही कुटुंबांकडून विराेध कायम आहे. मंगळवारी रात्री पुन्हा फलटणमध्ये संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी माेहिते-पाटील आणि निंबाळकर कुटुंबीय एकत्र आले हाेते. यानंतर मात्र माेहिते-पाटील समर्थकांनी साेशल मिडीयावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार, विजयदादा आणि तुतारीचे चिन्ह असलेले फाेटाे आपल्या डिपीवर लावून राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बाेर्डाची बुधवारी मुंबईमध्ये बैठक हाेत आहे. या बैठकीसाठी पंढरपूर, माढ्यातील नेत्यांना बाेलावणे आले. या बैठकीत माढ्याचा उमेदवार निश्चित हाेण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर धैर्यशील माेहिते-पाटील हे शरद पवार यांची भेट घेतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Web Title: Dhairyasheel Mohite Patil supporters set NCP Symbol man blowing tutari as DP so he may join Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.