पाणी देण्याचे वचन मोडले, त्या नेत्याला धडा शिकवा; मोदींची शरद पवारांचे नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:24 AM2024-05-01T09:24:38+5:302024-05-01T09:25:13+5:30

माढा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये आयोजित सभेत मोदी बोलत होते.

Break the promise of water, teach that leader a lesson narendra Modi criticized on Sharad Pawar | पाणी देण्याचे वचन मोडले, त्या नेत्याला धडा शिकवा; मोदींची शरद पवारांचे नाव न घेता टीका

पाणी देण्याचे वचन मोडले, त्या नेत्याला धडा शिकवा; मोदींची शरद पवारांचे नाव न घेता टीका

माळशिरस (सोलापूर), लातूर, धाराशिव : पंधरा वर्षांपूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्याने मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाणी देण्याचे वचन दिले होते. मात्र, दिलेले वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता मंगळवारी घणाघाती टीका केली.

माढा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये आयोजित सभेत मोदी बोलत होते. याशिवाय मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभांमध्येही मोदी यांनी स्थानिक पाणीप्रश्नावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ६० वर्षांपूर्वी गरिबी हटविण्याचा नारा काँग्रेसने दिला होता. मात्र, गरिबी हटली नाही. दहा वर्षांपूर्वी येथील नेत्यांना कृषिमंत्री बनविले होते. तेव्हा उसाची एफआरपी २०० रुपये होती. आता तीच एफआरपी ३५० पर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर ते केवळ राजकारण करीत राहिले.

काँग्रेस आणि समस्या जुळी भावंडे

लातूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या.

मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार योजना कोणी गुंडाळली? असा सवाल करीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना घेरत प्रादेशिक प्रश्नही मोदी यांनी भाषणात उचलून धरले.

काँग्रेस आणि समस्या ही जुळी भावंडे असल्याने देशासमोरच्या समस्या ६० वर्षे कायम राहिल्या. शेतकऱ्यांचे पॅकेज काँग्रेसच्या हाताने हिसकाविले, असा आरोपही त्यांनी केला.

युवराज, शहजादे, महाशय, शाही...

मोदी यांनी राहुल • गांधी यांचा उल्लेख काँग्रेसचे युवराज, शहजादे, महाशय, शाही परिवार असा केला. धाराशिवमध्ये २९, तर लातूरला ३० मिनिटे भाषण केले.

लातूरमध्ये मंचावर • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उमेदवार सुधाकर श्रृंगारे उपस्थित होते.

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह उमेदवार अर्चना पाटील मंचावर उपस्थित होते.

Web Title: Break the promise of water, teach that leader a lesson narendra Modi criticized on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.