खासदार रणजितसिंह यांना रामराजे नाईक निंबाळकर यांचा कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:55 PM2024-03-21T21:55:03+5:302024-03-21T21:55:12+5:30

उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी होण्यास आम्ही जबाबदार नाही : रामराजे यांचा जाहीर इशारा

Ramraje Naik Nimbalkar strongly opposes MP Ranjit Singh Naik Nimbalkar | खासदार रणजितसिंह यांना रामराजे नाईक निंबाळकर यांचा कडाडून विरोध

खासदार रणजितसिंह यांना रामराजे नाईक निंबाळकर यांचा कडाडून विरोध

फलटण : माढा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असा थेट विरोध करत हा विरोध अजित पवार यांच्यापर्यंत शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोहोचविला जाईल अशी भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील मेळाव्यात घेतली आहे.             माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत विचार विनिमय करण्यासाठी फलटण, माण, खटाव, कोरेगाव (उत्तर) तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा गुरुवारी फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रामराजे यांनी ही भूमिका घेतली.

मेळाव्यास आ. दीपकराव चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, अनिल देसाई, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर यांच्यासह फलटण, कोरेगाव, खटाव आणि माण तालुक्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

रामराजे म्हणाले की , तुम्हा कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी हा मेळावा घेतला आहे. तुमच्या भावना बाहेर पडल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहील का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ठामपणे सांगितले होते. आज उमेदवारी जाहीर होऊन किती दिवस झाले. परंतु, साधा फोन खासदार रणजितसिंह यांनी केला नाही. आमच्या मतांची गरजच नसेल तर आम्ही कशाला मागे लागून मते घ्या, मते घ्या म्हणू. फलटण तालुक्याचा सर्व कारभार बोराटवाडीतून चालणार असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री करा. मोदींच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू आहे. आम्हीसुद्धा इतकी वर्षे राजकारण केले. परंतु, सत्तेचा माज येऊ दिला नाही. आज माण, खटाव तालुक्याची काय अवस्था आहे. आमचा जिल्हा सुखी राहावा म्हणून उमेदवारी संजीवराजेंना द्या नाही तर आणखी कुणाला पण द्या, असे रामराजे यांनी स्पष्ट केले.

तुम्ही जी भूमिका घ्याल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू, अशी ग्वाही मुंबई मार्केट कमिटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांनी यावेळी दिली.            
मागील खासदारकीच्या निवडणुकीत आपण तन, मन, धनाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम केले. मात्र, त्याच खासदारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या विरुद्ध फॉर्म भरला अशी खंत व्यक्त करून अनिल देसाई यांनी खासदारांच्या विरुद्ध तुफान फटकेबाजी केली.

रामराजे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात तरी तुम्हाला युती धर्म पाळा म्हणताहेत. तिकडे अकलूजला भाजपमध्ये असून मोहिते पाटील घराण्याने प्रचार सुरू केला असल्याचे सांगितले. सुरेंद्र गुदगे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. बाळासाहेब शेंडे, माणिकराव सोनवलकर आदींनी आपल्या भाषणात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना विरोध दर्शविला. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले, तर भीमदेव बुरुंगले यांनी आभार मानले.

Web Title: Ramraje Naik Nimbalkar strongly opposes MP Ranjit Singh Naik Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.