माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश
By नितीन काळेल | Updated: April 11, 2024 21:56 IST2024-04-11T21:55:58+5:302024-04-11T21:56:38+5:30
उमेदवारीही मिळणार; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी सामना

माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचा माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत असून, धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी हाती घेणार आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा दहावा उमेदवार निश्चित होण्याचे संकेत असून, माढ्यात धैर्यशील आणि भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच सामना होणार आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाट्याला राज्यातील १० लोकसभा मतदारसंघ आले आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत तिढा होता. अनेक चर्चेनंतर साताऱ्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे साताऱ्याचा तिढा सुटला. आता राष्ट्रवादीच्या १० व्या उमेदवाराचाही शोध जवळपास संपला आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
माढ्यातून भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर महायुतीतील नेते नाराज झाले. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपमधील अकलूजचे मोहिते-पाटील यांचा समावेश आहे. या दोन्ही कुटुंबांनी निवडणूक लढवायचीच याचा चंग बांधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जाऊन तुतारी हाती घेण्याचाही विचार झाला. यासाठी पहिल्यापासून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, धैर्यशील यांच्या पवार यांच्याबरोबर भेटीही झाल्या होत्या. त्यामुळे ते भाजपला सोडणार असेच चित्र होते. त्याप्रमाणेच सध्या पावले पडत आहेत.
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी पुण्यात शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली. तेव्हाच स्पष्ट झाले की धैर्यशील हेच माढ्याचे उमेदवार राहणार. पण, त्यांनी अजून भाजपचा राजीनामा दिला नसलातरी येत्या दोन दिवसांत बऱ्याच राजकीय घडामोडी होणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीकडून माढ्याची उमेदवारी ही धैर्यशील मोहिते यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. पुढील आठवड्यात सोमवारनंतर केव्हाही माढ्यासाठी राष्ट्रवादीकडून ते अर्ज भरू शकतात अशी माहितीही मिळत आहे.
वेट अँड वाॅच अन् मोहितेंना लागला गळ...
माढा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय यावेळी मोठा चर्चेला आलेला आहे. महायुतीतील भाजपकडून खासदार रणजितसिंह यांना उमेदवारी मिळाली. विरोधामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नव्हता. त्यामुळेही चर्चा सुरू झाली. कारण, पक्षाकडे एकही प्रबळ उमेदवार नव्हता. यासाठी शरद पवार हे गळ टाकून होते. अकलूजचे मोहिते-पाटील भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे ते गळाला लागणार असा त्यांना अंदाज असावा. त्यामुळेच त्यांनी घाईने कोणतेही पाऊल उचलले नाही. काहीजणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. पण, त्यांनाही आधी मोहिते-पाटील यांचे काय होते ते पाहू असे सांगण्यात आले. त्यामुळे पूर्वीपासूनच राष्ट्रवादी व शरद पवार यांचा मोहिते-पाटील यांच्याकडेच कल होता. आता धैर्यशील यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.