घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:50 IST2024-04-11T15:41:25+5:302024-04-11T15:50:36+5:30
'उदयनराजेंचे मला जर आव्हान असते, तर महायुतीने आतापर्यंत उमदेवार जाहीर केला असता'

घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला
सातारा : उदयनराजेंचे मला जर आव्हान असते, तर महायुतीने आतापर्यंत उमदेवार जाहीर केला असता. ज्या अर्थी अजूनही उमेदवार जाहीर नाही, त्याअर्थी त्यांना अजून विश्वास नाही. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. साताराचा विकास पुढे नेण्यासाठी कोण पात्र आहे, हे जनता ठरवेल, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
सातारा लोकसभेसाठी इंडिया आघाडीतून शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. याअनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष आहे. सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, प्रशासन काही करत नाही. याशिवाय बेरोजगारी, पर्यटन, आयटी हब असे अनेक प्रश्न आहेत. अजेंड्यात अशा अनेक बाबी समाविष्ट असतील.
पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी शरद पवार सातारला निघाले होते, परंतु माझ्या पराभवाचे वृत्त समजताच त्यांनी तो दौरा रद्द केला होता. हे माझ्यावर उपकार आहेत. आज अनेक जण पक्ष सोडून जात असले, तरी मी निष्ठावंत राहिलो असून, राजकारणाच्या शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासाेबत राहणार आहे.
ज्यावेळी पक्षासमोर संघर्ष करण्याचे मोठे आव्हान होते, त्यावेळी शरद पवार यांनी माथाडी कामगाराच्या मुलाला व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन लोकसभेचे नेतृत्व करण्यासाठी धाडले. हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.