उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:11 AM2024-03-26T11:11:39+5:302024-03-26T11:16:15+5:30

Ajit Pawar NCP: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात साताऱ्यावर दावा सांगितला आहे.

cm eknath Shinde devendra Fadnavis problem due to the seat demanded by Ajit Pawar in exchange of Satara Lok Sabha seat | उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

Satara Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयार झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे जागावाटपाचा तिढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अनेक दिवस लोटल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकलेला नाही. मित्रपक्षांचं समाधान करण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राजकीय पक्षांकडून जागांची बदलाबदल सुरू असल्याचं चित्र आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबतही असंच होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या जागेवरून राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र भाजपही उदयनराजेंसाठी ही जागा सुटावी यासाठी आग्रही असून साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांना उत्तर महाराष्ट्रातील जागा सोडली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आमची हक्काची साताऱ्याची जागा तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्या, अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाने केल्याचे समजते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. नाशिकवरून आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनेही या जागेची मागणी केल्याने महायुतीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या जागावाटपात बारामती, शिरूर, रायगड आणि परभणीसह आणखी एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे. ही पाचवी जागा नाशिकची असणार की अन्य कोणती, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नाशिकवरून भाजप-शिवसेनेत टोकदार संघर्ष

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या कामाबाबत मतदारसंघात नाराजी असून शिवसेनेने उमेदवार बदलावा, यासाठी भाजपकडून आग्रह केला जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीमुळे भाजपच्या गोटातून संतप्त प्रतिक्रियाही देण्यात आल्या होत्या. त्यातच काल नाशिकमधील भाजपचे तीन आमदार आणि अन्य काही पदाधिकारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले होते. त्यामुळे नाशिकबाबतचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: cm eknath Shinde devendra Fadnavis problem due to the seat demanded by Ajit Pawar in exchange of Satara Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.