सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:36 IST2026-01-21T15:35:46+5:302026-01-21T15:36:46+5:30
दोघांशी गुप्त चर्चा : शिंदेसेनेशी युतीचा निर्णय लटकला

सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट
शितल पाटील
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप ३९ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमतासाठी एकाच जागेची कमतरता राहिली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून शिंदेसेनेच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील दोन नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्नही भाजपकडून केले जात आहेत.
महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ३९ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३ तर शिंदेसेनेला दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला एका जागेची गरज आहे. त्यासाठी शिंदेसेनेच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी त्यांनी चर्चा केली, तर मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून युतीबाबत ते सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
शिंदेसेनेच्या पाठिंब्यावर सांगलीत भाजपचा महापौर होईल; पण स्थायी समिती सभापतीचा पेच मात्र फसला आहे. स्थायी समितीत संख्याबळानुसार भाजपला ८, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला १ जागा मिळणार आहे. स्थायी समितीतही भाजप काठावरच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही सोबत घ्यावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय मुंबईत होणार आहे.
दरम्यान भाजपकडून आणखी दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटातील नगरसेवक युवराज गायकवाड व सुरेश बंडगर यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे दोन नगरसेवक भाजपसोबत आल्यास राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला वगळून भाजप महापौर व स्थायी समिती सभापतीपदावर वर्चस्व ठेवू शकते. या दोन्ही नगरसेवकांची भूमिका जयंत पाटील ठरवतील, असा स्पष्ट संकेत मिळाल्याने भाजपची रणनीती अडचणीत आली आहे.
सत्ता समीकरणे मुंबईतील नेतृत्वाकडे वळली
भाजपला आता राज्यातील सत्तेत असलेल्या आपल्या मित्रपक्षांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग भाजपसमोर उरलेला एकमेव पर्याय ठरत आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणे आता मुंबईतील नेतृत्वाच्या निर्णयांकडे वळली असून, पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेचा तिढा सुटणार की आणखी गुंतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खास व्यक्तीवर जबाबदारी
भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील दोन नगरसेवकांशी चर्चेसाठी खास व्यक्तींवर जबाबदारी दिली आहे. यात एक आमदार समर्थक तर दुसरा व्यक्ती भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित आहे. या दोन्ही खास व्यक्तींनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी प्राथमिक चर्चाही केली; पण त्यांनी थेट आमदार जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखविल्याने भाजपच्या डावपेचांना अडथळा निर्माण झाला आहे.