Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:03 IST2026-01-06T14:01:39+5:302026-01-06T14:03:31+5:30
भाजपविरुद्ध इतर पक्षातील उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर

Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर
सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगलेला दिसत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्व प्रभागांत उमेदवार दिले आहेत. परंतु, एकूण २० प्रभागांतील सात जागांवर भाजप उमेदवारांची ‘वन टू वन’ अर्थात कांटे की टक्कर, आरपारची लढाई होत आहे. या सात जागांवरील लढती म्हणजे ‘हाय होल्टेज’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सात जागांच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.
महापालिका स्थापनेनंतरच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, महायुतीमधील मित्र पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा फिस्कटली. भाजपने सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध प्रमुख पक्ष अशी लढत होत आहे. प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर २० प्रभागांतील ‘हाय होल्टेज’ लढतींची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
अनेक प्रभागांत तिरंगी, चौरंगी लढती होत असताना सात जागांवर मात्र थेट लढत होत आहे. नेते मंडळींनी हा योग घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या मिरजेतील प्रभाग ४ (ड)मधील निरंजन आवटी (भाजप) विरुद्ध शैलेंद्र देशपांडे (राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत), प्रभाग ९ (ब) मध्ये वर्षा सरगर (भाजप) विरुद्ध वृषाली पाटील (राष्ट्रवादी शरद पवार), प्रभाग ९ (क) रोहिणी पाटील (भाजप) विरुद्ध आसमा फकीर (काँग्रेस), प्रभाग ११ (ड) मनोज सरगर (भाजप) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), प्रभाग १३ (अ) महाबळेश्वर चौगुले (भाजप) विरुद्ध अभिजित कोळी (राष्ट्रवादी शरद पवार), प्रभाग १४ (ब) उदय बेलवलकर (भाजप) विरुद्ध शीतल सदलगे (शिंदेसेना), प्रभाग १६ (ब) विद्या दानोळे (भाजप) विरुद्ध सलमा शिकलगार (काँग्रेस) या सात लढती ‘वन टू वन’ अशा होत आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी अनेकांनी भाजपमध्ये तिकिटासाठी प्रवेश केला आहे. काहींनी अपेक्षेप्रमाणे तिकीट मिळविले आहे. भाजपने सर्व प्रभागांत उमेदवार उभे केले असले तरी त्यांच्या सात उमेदवारांना थेट लढत द्यावी लागणार आहे. या ठिकाणी उमेदवारांचा थेट सामना असल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचारास प्रारंभ केला आहे. तर या सात लढतींमधील उमेदवारांच्या समर्थकांना रात्रंदिवस एक करावा लागत आहे. उमेदवाराची प्रतिष्ठा ती आपली प्रतिष्ठा समजून कार्यकर्त्यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे.
या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
प्रभाग ११ (ड) मध्ये काँग्रेसमधून भाजपत आलेले खासदार विशाल पाटील यांचे एकेकाळचे खंदे समर्थक मनोज सरगर यांच्याविरोधात वसंतदादांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीतील ही सर्वांत मोठी हाय होल्टेज लढत मानली जाते. या प्रभागात नाराजांच्या फोडाफोडीचे राजकारण सध्या रंगले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.
समर्थकांची प्रतिष्ठा पणाला
यंदाची महापालिका निवडणूक चुरशीने होत असली तरी सात जागांवरील लढतीकडे अनेकांचे लक्ष आहे. या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभागातील हालचालींकडे ते लक्ष ठेवून आहेत. एकगठ्ठा मतदान आपल्याकडे वळविण्याकडे कल दिसून येत आहे.