सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली; भाजपच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:54 IST2025-12-24T17:53:53+5:302025-12-24T17:54:33+5:30
भाजप उमेदवारांची यादी मुंबईतच निश्चित होणार

सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली; भाजपच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने भाजपकडे जागा वाटपाबाबत अद्याप प्रस्तावच दिला नाही. त्यामुळे आता भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार) वगळून संभाव्य उमेदवारांची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आली. ही यादी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. भाजप उमेदवारांची यादी मुंबईतच निश्चित होणार असून, २६ अथवा २७ ला उमेदवार जाहीर होणार आहेत.
मिरज येथील एका खासगी फार्म हाऊसवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आ. दिनकर पाटील, नीता केळकर उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थिती, मागील निवडणुकांचे निकाल, उमेदवारांची सामाजिक स्वीकारार्हता, संघटनात्मक कामगिरी, तसेच ‘विनिंग मेरीट’ या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
पक्षात नव्याने आलेले कार्यकर्ते व जुन्या कार्यकर्त्यांमुळे उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. कोअर कमिटीतील चर्चेनंतर भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेली पाच सदस्यीय समिती ही यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाजपची अंतिम उमेदवार यादी २६ किंवा २७ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) भाजपकडे जागांबाबत कोणताच प्रस्ताव दिलेला नाही. भाजपच्या नेत्यांनी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांची दोनदा भेट घेऊन राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागितली होती. पण राष्ट्रवादीने ही यादी भाजपकडे दिली नाही. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीत युती होण्याची शक्यता मावळली आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली राज्यपातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, काँग्रेसलाही सोबत घेऊन भाजपविरोधात निवडणूक लढविण्याच्या शक्यता वाढली आहे.
शिंदेसेना, जनसुराज्य, रिपाइंला किती जागा?
महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना, जनसुराज्य आणि आरपीआय आठवले गट यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने संभाव्य उमेदवारांची यादी दिली नाही. तर शिंदेसेना, जनसुराज्य आणि आरपीआयने जागांचा आग्रह धरला आहे. आता या तिन्ही पक्षांना किती जागा मिळतात, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
भाजपच्या नेत्यांनी दोनदा भेट घेऊन राष्ट्रवादी (अजित पवार)च्या संभाव्य उमेदवारांची यादी मागविली होती. पण, आम्ही ती दिली नाही. राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पूर्ण झाल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. - प्रा. पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)