Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:02 IST2025-03-19T19:01:30+5:302025-03-19T19:02:04+5:30
कार्यकर्त्यांची मने जुळवण्यात अपयश

Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. परंतु इस्लामपूर मतदारसंघात त्यांना यश आले नाही. याउलट शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांच्या रूपाने भाजपला यश मिळाले. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या एन्ट्रीने भाजपपुढे स्वत:ची ताकद वाढविण्याचे आव्हान आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा तुर्तास थांबली आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात भाजपची ताकद बॅकफूटवर आहे. शिराळा मतदारसंघातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी शिराळा मतदारसंघाबरोबर इस्लामपूर मतदारसंघात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांचीही ताकद आहे. परंतु वेगवेगळे गट त्यातच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील भाजपची ताकद एकसंघ राहिलेली नाही.
शिराळा मतदारसंघात महाडिक बंधू यांनी आमदार सत्यजित देशमुख यांना साथ दिली आहे. त्यामुळेच याठिकाणी आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडिक बंधूंना ताकद दिली आहे. त्यामुळेच राहुल महाडिक यांनी पक्ष नोंदणी अभियानावर भर दिला आहे. त्यांना प्रतिसादही मिळत आहे.
परंतु, शिराळा मतदारसंघातील ४८ गावांत महायुतीतील मित्र पक्ष असलेली शिंदेसेना आणि अजित पवार यांचा गट सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जयंत पाटील यांनाच टार्गेट करण्याचा डाव आखला आहे.
महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा..
महायुतीतील कार्यकर्त्यांची मने जुळवण्यासाठी नेत्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. सध्या इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजपचे आमदार देशमुख आणि महाडिक गटाची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. अन्यथा शिंदेसेना व अजित पवार यांचा पक्ष या दोन्ही मतदाहसंघात आपली ताकद वाढवताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षातच विस्तारासाठी स्पर्धा पहायला मिळत आहे.
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजपतर्फे सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे भाजपची ताकद भविष्यात आणखी वाढणार आहे. शिराळा मतदारसंघात कमळ फुललेच आहे. आगामी काळात इस्लामपूर मतदारसंघात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. -राहुल महाडिक, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक