कोरेगावात रेल्वेवर दगडफेक, महिलेचे मंगळसूत्र लंपास; पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:33 IST2025-04-08T13:32:47+5:302025-04-08T13:33:20+5:30

मिरज : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे कोल्हापूर - पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र ...

Stones pelted on train in Koregaon, woman mangalsutra theft Incident on Pune Kolhapur Express | कोरेगावात रेल्वेवर दगडफेक, महिलेचे मंगळसूत्र लंपास; पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार

संग्रहित छाया

मिरज : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे कोल्हापूर-पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून हिसकावून लंपास केले. महिला प्रवाशाने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यानी लोको पायलटवर दगडफेक करून अंधारात पलायन केले. याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी मध्यरात्री सव्वा वाजता कोरेगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. कोल्हापूर-पुणे विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाला लुटल्याने तिच्या मुलाने साखळी ओढून एक्स्प्रेस थांबविली. एक्स्प्रेस थांबल्याचे पाहून चोरट्यांनी इंजिन चालकावर दगडफेक केली.

या एक्स्प्रेसमधून धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा (वय ५८ रा. कांदिवली) या महिला प्रवासी कुटुंबातील सदस्यांसमवेत कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही एक्स्प्रेस सुटली. रात्री एक वाजून दहा मिनिटांनी कोरेगाव रेल्वे स्थानकावर आली. कोरेगाव ते कराड दरम्यान एकेरी लोहमार्ग असल्याने क्रॉसिंगसाठी एक्स्प्रेसला कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. दहा मिनिटे ही एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती.

एक वाजून वीस मिनिटांनी एक्स्प्रेस पुढच्या प्रवासाला निघाली असतानाच अचानक उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने धर्मादेवी विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मणी मंगळसूत्र खेचून नेले. विश्वकर्मा यांनी आरडाओरडा करताच त्यांचा मुलगा सतीश हा झोपेतून उठला. त्याने एक्स्प्रेसमधील साखळी ओढल्यानंतर इंजिन चालकाने प्रसंगावधान राखत एक्स्प्रेस जागेवर थांबवली. एक्स्प्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांनी चालकांच्या दिशेने दगडफेक केली. अंधाराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते तिघेजण पसार झाले.

कोल्हापूरमध्ये पोहोचताच तक्रार

विश्वकर्मा या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी नऊ वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मिरज रेल्वे पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. के. ओंबासे तपास करत आहेत.

पोलिस सुरक्षा नाही

सह्याद्री एक्स्प्रेसच्या वेळेत सुरू केलेल्या कोल्हापूर पुणे विशेष एक्स्प्रेसला दररोज गर्दी असते. मात्र, या गाडीत रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त नसल्याने चोरट्यांनी हे कृत्य केले.

Web Title: Stones pelted on train in Koregaon, woman mangalsutra theft Incident on Pune Kolhapur Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.