विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:04 PM2024-04-22T12:04:56+5:302024-04-22T12:07:21+5:30

विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यात थोरात यशस्वी होणार का? याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे लक्ष

State leaders met in Sangli today to quell Vishal Patil rebellion | विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

सांगली : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी रविवारी दिवसभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. पण, त्यांचे बंड थोपविण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले नाही. सोमवार, दि. २२ रोजी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात सांगलीत येत आहेत. विशाल पाटील यांना बंडखोरी मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर ते काय निर्णय घेतात, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी उध्दवसेनेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना दिली आहे. यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीचा महाविकास आघाडीच्या उमेदवारीला फटका बसणार आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेते व उध्दवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी रविवारी काँग्रेस नेत्यांकडे विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घ्यावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विशाल पाटील यांना विधान परिषदेचा प्रस्ताव दिला आहे.

पण, त्यांनी तो धुडकावला आहे. यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सोमवारी सांगलीत येत आहेत. काँग्रेसमधील बंड थोपविण्याची जबाबदारी थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यात थोरात यशस्वी होणार का? याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

बंडखोरी मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. यासाठी महाविकास आघाडीकडूनही दबाव आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही तर त्यांच्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून पक्षातून हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, अशी चर्चा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: State leaders met in Sangli today to quell Vishal Patil rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.