Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:42 IST2026-01-02T13:40:04+5:302026-01-02T13:42:33+5:30
शिंदेसेनेच्या उमेदवारांचा फायदा काँग्रेसच्या पॅनेलला होईल का? याचीही गणिते मांडली जात आहेत

Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत दररोज नवनव्या आघाड्या- युती समोर येऊ लागली आहे. सांगलीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस व शिंदेसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी काही प्रभागातून शिंदेसेनेच्या उमेदवारांचा अर्ज माघारी घेण्यावरही गुरुवारी दिवसभर चर्चा सुरू होती. तसेच शिंदेसेनेच्या उमेदवारांचा फायदा काँग्रेसच्या पॅनेलला होईल का? याचीही गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेसह महाआघाडीशीही दोन हात करावे लागणार आहेत.
महापालिका निवडणुकीत भाजपने जनसुराज्य शक्ती व रिपाइंला सोबत घेत ७८ जागांवर उमेदवार दिले. युती तुटल्यानंतर शिंदेसेनेनेही ६५ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यात भाजपमधील माजी नगरसेवक युवराज बावडेकर, वैशाली बनसोडे, शीतल सदलगे, सुजित काटे, प्रा. रवींद्र ढगे यांच्यासह अनेकांना उमेदवारी दिली.
वाचा : माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन
दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) व महाआघाडीत छुपा समझोता होऊन त्यांनी बहुतांश प्रभागात एकमेकांतील लढत टाळली आहे. भाजपशी थेट लढत देण्याची रणनीती महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार)ची आहे; पण शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजपविरोधातील मोट बांधण्याचा डाव फसण्याची चिन्हे दिसत होती.
यंदा निवडणुकीत भाजप विरोधी सारे एकवटले
गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि महाआघाडीतील नेत्यांनी शिंदेसेनेच्या प्रमुखांशी चर्चा सुरू केली होती. भाजपविरोधात एकच पॅनेल उभे करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार काही प्रभागातून शिंदेसेनेचे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच महाआघाडीने उमेदवार दिलेल्या प्रभागातही शिंदेसेनेचे पॅनेल आहे. पण, या पॅनेलचा महाआघाडीला कसा फायदा होईल व भाजपला शह बसेल, यावरही चर्चा करण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात सारे असे चित्र दिसत आहे. त्यावर आज, शुक्रवारी अर्ज माघारीनंतरच शिक्कामोर्तब होणार आहे.