Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:05 IST2024-10-21T18:44:55+5:302024-10-21T19:05:42+5:30
कार्यकर्ते मात्र संभ्रमात

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभेची हवा पलटू लागली आहे. मतदारसंघ शिंदेसेनेसाठीच असताना भाजपने आपला उमेदवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष कमळाला सोडून आता घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे इस्लामपूर मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे समजल्याने शिंदेसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरीसुद्धा महायुतीकडून उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. इस्लामपूर मतदारसंघ महायुतीत शिवसेनेसाठी सोडला जाताे, असा अलिखित नियम असल्याने शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि इस्लामपूर मतदारसंघाचे शिवसेना निवडणूक प्रमुख गौरव नायकवडी यांनी उमेदवारीच्या निर्णयाचा चेंडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलला होता.
इस्लामपूर मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला आहे. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही, म्हणूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना कमळाऐवजी घड्याळ बांधून तुतारीला आव्हान देण्याची खेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे. निशिकांत पाटील यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला.
इस्लामपूर नगरपालिकेत आमची ताकद आहे. त्यामुळे मतदारसंघात आमचे नेते आनंदराव पवार हेच उमेदवार असतील. आमचा विचार केला नाही, तर वेळ येईल तशी भूमिका मांडू. - सागर मलगुंडे, तालुकाध्यक्ष, शिंदेसेना
आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची बांधणी इस्लामपूर मतदारसंघात सुरू आहे. मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे गेला आहे. महायुतीतून उमेदवार शोधमोहीम सुरू आहे. सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. - केदार पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (अजित पवार गट)
महायुतीतील सर्व नेत्यांचा निर्णय होईल. हा निर्णय सर्व पक्षातील जबाबदारी मानून एकासएक लढती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली तरच विरोधकांचा सुपडासाप होईल. - प्रसाद पाटील, निमंत्रक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप