Sangli Municipal Election 2026: मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड; शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:16 IST2026-01-01T12:14:09+5:302026-01-01T12:16:44+5:30
हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले

Sangli Municipal Election 2026: मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड; शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची पोलिसांत तक्रार
सदानंद औंधे
मिरज : महापालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरु होण्यापूर्वीच मिरजेत वातावरण तापले असून प्रभाग तीनमध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता व्हनमाने यांच्या घरावर काल, बुधवारी मध्यरात्री हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची तक्रार व्हनमाने यांनी केली. शिंदेसेनेचे सागर व्हनखंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मिरजेत प्रभाग तीनमध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता व्हनमाने विरुद्ध शिंदेसेनेचे सागर व्हनखंडे अशी लढत होणार आहे. चार दिवसापूर्वी येथे व्हनमाने व व्हनखंडे समर्थकांत बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटविण्यात आले होते.
त्यानंतर बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता व्हनमाने यांच्या घरावर हल्ला झाला. व्हनमाने यांच्या तक्रारीनुसार दहाजणांच्या टोळीने घरावर हल्ला चढवला. यावेळी घरासमोर असलेल्या चारचाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या. दुचाकीची मोडतोड करण्यात आली. यावेळी व्हनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले.
यातील दोघे संशयित खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असे धमकावल्याची तक्रार सुनीता व्हनमाने यांचे पुत्र संदीप व्हनमाने यांनी केली. शिंदेसेनेचे उमेदवार सागर व्हणखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप व्हनमाने यांनी केला. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसही तासभर उशिरा आल्याची तक्रार व्हनमाने यांनी केली.हल्ल्याच्या घटनेचे सिसिटिव्हीत चित्रण झाले आहे. या घटनेमुळे इस्राईलनगर परिसरात खळबळ उडाली होती.