माफी मागा, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही; गोपीचंद पडळकरांना आंदोलकांचा इशारा, इस्लामपुरात तीव्र निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:32 IST2025-09-20T15:31:18+5:302025-09-20T15:32:03+5:30
’राष्ट्रवादी’कडून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

माफी मागा, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही; गोपीचंद पडळकरांना आंदोलकांचा इशारा, इस्लामपुरात तीव्र निषेध
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सर्वच वक्त्यांनी पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, नाही तर घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला. या मोर्चावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्ष सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. शामराव पाटील, विजयराव यादव, माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, अशोक पाटील, दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजित पाटील उपस्थित होते. आमदार जयंत पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील यांच्यावरील वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
संजय पाटील म्हणाले, ‘आ. पाटील यांचे राजकारणात तुझ्या वयापेक्षा अधिक वर्षांचे काम आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. ज्यांच्याकडे गृहखाते आहे त्यांनी या प्रवृत्तीला आवर घालावा. अन्यथा वाईट परिणाम होतील.’
झुंझारराव पाटील म्हणाले, ‘अशी बेताल वक्तव्य करणाऱ्याना आवर घालावा. अन्यथा प्रशासनाला अवघड जाईल.’ संभाजी कचरे म्हणाले, ‘आता राजकारणात आला आहे. शिक्षकांचा मुलगा म्हणतो पण हा शिक्षकांचा नसावा. या माणसामुळे धनगर समाजाची हानी झाली आहे. त्याने आमदार जयंत पाटील यांची माफी मागावी.’
सुनीता देशमाने म्हणाल्या, ‘वाळवा तालुक्यातील महिला घरात येऊन बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत.’ शहाजी पाटील म्हणाले, ‘स्वतःच्या गावात, आटपाडी तालुक्यात किंमत नाही. समाजातून किंमत संपली आहे. त्यांची किंमत बिरोबाने संपवली आहे. पडळकर यांनी माफी मागावी. नाही तर हे आंदोलन असेल चालू राहणार आहे.
यावेळी अरुणादेवी पाटील, विशाल माने, पुष्पलता खरात, सुनील मलगुंडे, अशोक वाटेगावकर, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, शंकरराव चव्हाण, शिवाजी चोरमुले, शैलेश पाटील, धैर्यशील पाटील, लालासाहेब अनुसे, माणिक शेळके, शिवाजी वाटेगावकर, अर्जुन माने, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, छाया पाटील, डॉ. योजना शिंदे यांनी पडळकर यांचा निषेध केला.
वाचाळवीराच्या गळ्यात पट्टा घालावा
विजयराव पाटील म्हणाले, ‘आमदार पडळकर यांची लायकी नसताना ते टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी असल्या वाचाळवीराच्या गळ्यात पट्टा घालावा. वाळवा तालुका पेटून उठल्यावर प्रशासनाला आवरता येणार नाही. जयंत पाटील यांच्यावर टीका करून प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकर यांचा राजीनामा घ्यावा.’