पुतण्याने चिमटा काढला, चुलत्याने इशाराच दिला; रोहित पवार-अजित पवारांमध्ये रंगला कलगीतुरा, काय म्हणाले.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:21 IST2025-08-16T14:21:16+5:302025-08-16T14:21:46+5:30
'..त्यामुळे लागेल तेवढे मागा दिले जाईल'

पुतण्याने चिमटा काढला, चुलत्याने इशाराच दिला; रोहित पवार-अजित पवारांमध्ये रंगला कलगीतुरा, काय म्हणाले.. वाचा
इस्लामपूर : शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात आज, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कलगी तुरा रंगला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची हसून पुरेवाट झाली. दादा आता गावकीचा विचार करतात. ते भावकीला विसरलेत असा चिमटा रोहित पवार यांनी काढल्यावर अजित पवार यांनी भावकीकडे लक्ष दिल्यानेच तू आमदार झालास ते टपाली मतावर असा प्रति चिमटा काढत नेहमीच्या स्टाईलने माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि एन.डी.पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन असा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार जयंत पाटील, रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोजमाई पाटील यांनी या दिग्गज नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले. त्यांच्यासमोरच पवार काका-पुतण्यामध्ये वाक् युध्द रंगले.
लाख कोटींच्या तिजोरीचा मालक इंथे बसलाय
रोहित पवार यांनी ४० लाखांची देणगी जाहीर करत यावर चंद्रकांतदादा एक शून्य तर अजितदादा दोन शून्य वाढवतील अशी कोटी केली. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, एक-दोन शून्यांनी काय होणार त्यापेक्षा अजितदादाकडे पाहत आठ लाख कोटींच्या तिजोरीचा मालक इंथे बसलाय. त्यामुळे लागेल तेवढे मागा दिले जाईल, असे सांगताना आम्ही तुमच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असा टोला रोहित पवार यांना मारला.
तुमच्या सारख्याच खडतर परिस्थितीमधून पुढे आलो
हाच धागा पकडत अजित पवार यांनी आम्ही सुध्दा तुमच्या सारख्याच खडतर परिस्थितीमधून पुढे आलो आहोत असा चिमटा चंद्रकांतदादांना काढत रोहितच्या वेळेला परिस्थिती बदलल्याची मिष्किल टिपणी केली. या सगळ्यामध्ये मात्र आ.जयंत पाटील यांनी सावध पवित्रा घेत काही कमी पडले तर आम्ही आहोतच असे सांगत प्रसंगावधान राखले.