आपलं मुलही बनेल स्मार्ट- कॉन्फिडंट! ८ स्मार्ट पेरेंटिंग टिप्स, आईबाबांची साथ-मुलं होतील हुशार
Updated:May 19, 2026 21:00 IST2026-05-19T21:00:00+5:302026-05-19T21:00:02+5:30
Parenting Hacks for Success: Kids Confidence Building Tips: Good Habits for Children: आपल्याला कोणत्याही मानसिक दबावाशिवाय मुलांना गुणी, हुशार आणि चांगला माणूस बनवायचे असेल तर ८ स्मार्ट पेरेंटिंग टिप्स लक्षात ठेवा.

मुलांचा वाढता स्क्रीन टाईम, बाहेरच्या जगाशी स्पर्धा आणि मुलांमधील वाढता हट्टीपणा किंवा चिडचिड यांमुळे अनेकदा पालक हतबल होतात. माझं मूल ऐकतच नाही," किंवा "ते सतत मोबाईलमध्ये असतं," ही सततची पालकांची कुरबूर असते. मुलांना शिस्त लावण्यासाठी पालक अनेकदा ओरडतात, रागवतात किंवा मारतातही पण यामुळे मुलं सुधारण्याऐवजी ती अधिक हट्टी किंवा अंतर्मुख होतात. (Parenting Hacks for Success)
प्रत्येक पालकांना असं वाटतं की त्यांचं मूल जगात सर्वात स्मार्ट, आत्मविश्वासू आणि समंजस असायला हवं. पण घराचं वातावरण आणि मुलांशी संवाद कसा साधता, यावर मुलांचं भविष्य अवलंबून असतं. जर आपल्याला कोणत्याही मानसिक दबावाशिवाय मुलांना गुणी, हुशार आणि चांगला माणूस बनवायचे असेल तर ८ स्मार्ट पेरेंटिंग टिप्स लक्षात ठेवा. (Kids Confidence Building Tips)
मुलांना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवायचे असेल तर आधी पालकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा. रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्याशी गप्पा मारा. जेव्हा आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतो, तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
मूल जेव्हा एखादी चूक करतं तेव्हा त्याच्यावर ओरडण्याऐवजी त्याला प्रेमाने समजावून सांगा. केलेल्या चुकांमधून तो काय शिकला हे विचारा. चुकांमधून शिकण्याची सवय मुलांना भविष्यात नवनवीन गोष्टी करायला प्रेरित करते.
मुलांना कधीही कमी लेखू नका. तू ढ आहेस, तू हट्टी आहेस किंवा आळशी आहेस अशी लेबल्स लावू नका. आपण वारंवार जे बोलतो, मूल स्वत:ला तसेच समजू लागतात. त्याऐवजी त्यांच्या चांगल्या वागण्याचे कौतुक करा, ज्यामुळे ते अधिक गुणी बनतील.
मुलांना लहानपणापासून छोटे-छोटे निर्णय घेऊ द्या. कपडे काय घालायचे, खेळायला कुठे जायचं? अशा अनेक छोट्या प्रसंगांमुळे मुलांची निर्णयक्षमता वाढते. ज्यामुळे भविष्यात ते अधिक आत्मविश्वासू बनतात.
मुलांची एकमेकांशी तुलना करु नका. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक मुलाची शिकण्याची आणि वाढण्याची गती वेगली असते. आपल्या मुलाची तुलना फक्त त्याच्या भूतकाळाशी करा, इतरांशी नाही.
मुलं जेव्हा रडतात किंवा रागवतात तेव्हा त्यांना रडू नको किंवा चिडू नको म्हणून गप्प करु नका. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांच्याशी शांतपणे संवाद साधा.
मुलं आपण जे सांगतो ते ऐकत नाही तर आपण जे करतो त्याचं अनुकरण करतात. आपण सतत मोबाईल घेऊन बसलेलो असू किंवा इतरांवर ओरडत असू तर मुलंही तेच शिकणार. मुलांना गुणी बनवायचे असेल आधी स्वत:च्या वागण्यात बदल घडवा.