Coconut Water Benefits: उन्हाळ्यात नारळपाणी सगळ्यात जास्त प्यायलं जातं. हे एक हेल्दी ड्रिंक मानलं जातं. जे शरीराला झटपट हायड्रेट करण्यासोबतच थंडावा देण्याचंही काम करतं. त्यामुळे फिटनेस आणि हेल्थ एक्सपर्ट्स सकाळी उपाशीपोटी नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. यात असलेलं पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक प्रकारे फायदे देऊ शकतात. मात्र, इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणे याचं सेवनही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं करणं महत्त्वाचं मानलं जातं. अशावेळी उपाशीपोटी नारळपाणी पिऊ शकतो का आणि त्याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेऊया.
शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं नारळपाणी
नारळ पाण्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक म्हटलं जातं. यात असलेले पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यास मदत करतात. उन्हाळ्यात जास्त घाम येणे किंवा वर्कआउटनंतर नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उपाशीपोटी हे प्यायल्यास शरीराला लवकर हायड्रेशन मिळतं.
पचन सुधारण्यासही उपयुक्त
उपाशीपोटी नारळपाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते. यात असलेले एन्झाइम्स आणि फायबर पोट हलकं ठेवण्यास मदत करतात. नियमित प्याल तर बद्धकोष्ठता, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. अनेक हेल्थ एक्सपर्ट्स हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक मानतात, कारण ते शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी नारळपाणी फायदेशीर मानलं जातं. यात कॅलरीज कमी असतात आणि ते जास्त वेळ पोट भरल्यासारखं ठेवतात. त्यामुळे वारंवार भूक लागणं आणि अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची सवय कमी होऊ शकते. तसेच हे मेटाबॉलिझम सुधारण्यासही मदत करू शकतं.
त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त
नारळ पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्स त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते आणि त्वचा चमकदार दिसू शकते. अनेकांच्या मते, यामुळे केसांची मजबुती आणि चमक टिकवून ठेवण्यासही मदत होते.
कुणी नारळ पाणी पिताना काळजी घ्यावी?
नारळपाणी खूप फायदेशीर असलं तरी ते प्रत्येकासाठी सारखंच योग्य असेल असं नाही. ज्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी उपाशीपोटी नारळपाणी घेतल्यास चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.कारण हे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करू शकते.
डायबिटीज असलेल्या लोकांनाही कमी प्रमाणातच नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे जास्त प्रमाणात प्यायल्यास ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. तसेच किडनीसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचं जास्त सेवन करू नये, कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. काही लोकांना उपाशीपोटी नारळपाणी प्यायल्यावर पोटात गडबड, गॅस किंवा सौम्य जुलाब होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात नारळपाणी पिणे अधिक योग्य मानले जाते.
