उन्हाळा आला की आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात आंब्याच्या गार रेसिपी सुंदर असतात. अशाच अनेक मस्त रेसिपींपैकी एक म्हणजे मँगो मस्तानी. हा पदार्थ विशेष लोकप्रिय मानला जातो. हा एक गार, गोड आणि श्रीमंत चवीचा डेझर्ट ड्रिंक प्रकार आहे. (Make Puneri Mango Mastani at home during mango season - thick and creamy drink - see the perfect recipe)महाराष्ट्रात विशेषतः पुणे येथे मँगो मस्तानी खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक उन्हाळ्यात खास हा पदार्थ खाण्यासाठी बाहेर जातात. पुण्यातच या पदार्थाची सुरवातही झाली.
मँगो मस्तानीमध्ये आंब्याचा गर, दूध, आईस्क्रीम, ड्रायफ्रूट्स आणि वर सजावटीसाठी विविध गोड पदार्थ वापरले जातात. त्यामुळे त्याची चव साध्या मँगो मिल्कशेकपेक्षा अधिक रिच आणि क्रीमी लागते. हा पदार्थ दिसायलाही आकर्षक असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. करायला अगदी सोपा आहे. पाहा कसा करायचा.
साहित्य
आंबा, व्हॅनिला आइस्क्रिम, काजू, दूध, बदाम, पिस्ता, साखर
कृती
१. छान ताजा रसाळ आंबा घ्यायचा. दोन ते तीन आंबे घ्या म्हणजे छान घट्ट मस्तानी करता येईल. आंब्याचा रस काढून घ्या किंवा आंब्याची सालं काढून गराचे तुकडे करा. आंब्यांचा गर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात थोडे काजू घालायचे. बदाम घालायचे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे.
२. सगळं छान एकजीव होईल याची काळजी घ्यायची. त्यात आवडीनुसार व्हॅनिला आइस्क्रिम घालायचे. थोडे दूध घालायचे. अगदी थोडी साखर घालायची. नाही घातली तरी चालेल. आइस्क्रिम बऱ्यापैकी गोडच असते. तसेच आंबाही गोड असतो.
३. छान वाटून घ्यायचे. फार पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची. जरा घट्टच असायला हवे. फ्रिजमध्ये ठेवा आणि गार करुन घ्या. नंतर एका ग्लासमध्ये ओता. त्यात वरतून बारीक चिरलेला पिस्ता , काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालायचे. थोडं आइस्क्रिम घालायचे. सगळं छान एकत्र करायचे आणि गारेगार खायचे.
