भेंडीची भाजी अनेकांना आवडते. खास म्हणजे लहान मुलही भेंडी आवडीने खातात. इतर भाज्या खाताना मुलं फार नखरे करतात मात्र भेंडी खातात. पुन्हा कर असंही सांगतात. भेंडी करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी. मुलांना मात्र छान कुरकुरीत भाजी आवडते. (Do you like okra but can't cook properly ? try these 3 tricks, it will taste good )ती करताना एकच समस्या वारंवार येते, भाजी गिळगिळीत (चिकट) होते. थोडी काळजी घेतली तर भेंडीची भाजी कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिकही होऊ शकते. यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडी स्वच्छ धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करणे. भेंडीवर पाणी राहिले तर भाजी करताना चिकटपणा वाढतो. त्यामुळे धुतल्यानंतर ती कापण्याआधी कापडाने किंवा टिश्यूने नीट पुसून घ्या. भेंडी इतर भाज्यांप्रमाणे पाण्याखाली धरु नये. ओल्या फडक्यात गुंडाळून स्वच्छ करावी.
भेंडी चिरताना ती जास्त बारीक किंवा खूप लहान तुकड्यांमध्ये कापू नका. मध्यम आकाराचे तुकडे ठेवले तर भाजी जास्त छान राहते आणि चिकटपणा कमी होतो. तसेच, भाजी तयार करताना सुरुवातीला झाकण न ठेवता मध्यम आचेवर परतून घ्या. त्यामुळे भेंडीतील ओलावा कमी होतो.
भेंडीची भाजी करताना आंबट घटकांचा वापर करणेही फायदेशीर ठरते. कोकम किंवा चिंच घातल्याने चिकटपणा कमी होतो आणि चवही वाढते. मात्र हे पदार्थ शेवटी घालावेत, त्यामुळे भाजीचा स्वाद संतुलित राहतो. सुरवातीला घातले तर भाजी खराब होते.
भाजी करताना वारंवार ढवळणे टाळा. सतत चमचा फिरवला तर भेंडी अधिक चिकट होते. थोड्या वेळाने हलक्या हाताने ढवळल्यास भाजी व्यवस्थित शिजते आणि तिचं टेक्स्चर टिकून राहतं. तेलाचाही योग्य वापर महत्त्वाचा आहे. खूप कमी तेल वापरल्यास भेंडी चिकट होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे सुरुवातीला थोडेसे जास्त तेल घालून परतणे चांगले. यामुळे भेंडी छान कुरकुरीत होते. झाकण जास्त वेळ ठेवणं टाळा. म्हणजे भाजी मस्त मोकळी होते.
