उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर टॅनिंग, त्वचा काळवंडणे, रापणे आणि कोरडेपणा अशा समस्या वाढू शकतात. सतत उन्हात फिरणे, प्रदूषण आणि घाम याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे फक्त चेहरा धुणे पुरेसे नसते, तर योग्य ब्यूटी रुटीनही तितकेच महत्त्वाचे ठरते.(Do 5 things - your face will have a soft glow , skincare routine for women ) काही साध्या स्किनकेअर टिप्स नियमित केल्यास टॅनिंग कमी होण्यास मदत मिळू शकते आणि त्वचा ताजी व निरोगी दिसू शकते.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे ही सर्वात महत्त्वाची सवय. अनेकजण फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरतात, पण प्रत्यक्षात रोज त्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. चेहरा, मान, हात यांसारख्या भागांवर ऊन थेट पडते. योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावल्यास सूर्यकिरणांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत मिळते.
त्वचा स्वच्छ ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. दिवसभर बाहेर राहिल्यानंतर चेहर्यावर धूळ, घाम आणि तेल जमा होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा फ्रेश राहण्यास मदत होते. मात्र वारंवार चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी पडू शकते, त्यामुळे त्याचाही अतिरेक टाळावा.
टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपायांचाही अनेकजण वापर करतात. दही, बेसन, टोमॅटो, काकडी किंवा गुलाबपाणी यांसारख्या पदार्थांचा फेसपॅक त्वचेला थंडावा देण्यास मदत करू शकतो. तसेच कोरफडीचाही वापर करतात. त्यामुळे त्वचा शांत होते आणि उन्हामुळे झालेली जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते.
त्वचेला मॉइश्चरायझरचीही गरज असते. उन्हाळ्यात घाम येत असला तरी त्वचा आतून कोरडी पडू शकते. त्यामुळे हलके आणि त्वचेला सूट होणारे मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरू शकते. पाणी कमी पिण्याचाही परिणाम त्वचेवर दिसतो. शरीर हायड्रेटेड राहिल्यास त्वचा अधिक ताजी आणि निरोगी दिसण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे, फळे खाणे आणि ताजे पदार्थ आहारात ठेवणे महत्त्वाचे आहे.
तसेच बाहेर पडताना स्कार्फ, टोपी, सनग्लासेस किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरल्यास त्वचेचे उन्हापासून संरक्षण होऊ शकते. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात शक्यतो जास्त वेळ फिरणे टाळावे. त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादनेच लागतात असे नाही. नियमित स्वच्छता, योग्य आहार, पुरेसे पाणी आणि साधे स्किनकेअर रुटीन यामुळेही त्वचा निरोगी आणि उजळ दिसू शकते. उन्हामुळे होणारे टॅनिंग कमी ठेवण्यासाठी सातत्याने त्वचेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते.
