kesari movie review | kesari movie review : शूरांची गाथा सांगणारा केसरी
kesari movie review : शूरांची गाथा सांगणारा केसरी
Release Date: March 21,2019Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, मीर सरवर
Producer: अक्षय कुमार व करण जोहरDirector: अनुराग सिंग
Duration: २ तास ४० मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देचित्रपटाचा विषय चांगला असला तरी मध्यंतरपर्यंत काहीच घडत नाही असे वाटते. सुरुवातीची लढाई, गाणं आणि पात्रांची ओळख या व्यतिरिक्त चित्रपटात काहीच पाहायला मिळत नाही.

प्राजक्ता चिटणीस 

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. एखादी ऐतिहासिक घटना पडद्यावर मांडणे सोपे नसते. पण हे आव्हान दिग्दर्शकाने पेलले आहे.

केसरी या चित्रपटाची सुरुवात त्या काळात स्त्रियांना कशाप्रकारे वागवले जायचे या गोष्टीने होते. एका स्त्रीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध करून देण्यात आलेले असते त्यामुळे तिला नवऱ्यासोबत संसार करायचा नसतो. ती त्याच्या घरातून पळ काढते. पण तिला पकडून मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी एका स्त्रीवर झालेला अन्याय हवालदार इशार सिंग (अक्षय कुमार)ला पाहवत नाही आणि तो तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर हल्ला करतो आणि तिची सुटका करतो. पण ब्रिटिशांच्या सैन्यात असलेल्या इशार सिंगने केलेली ही गोष्ट ब्रिटिशांना पटत नाही आणि त्याची बदली सारागढी येथे करण्यात येते. सारगडी मध्ये इशार सिंग गेल्यानंतर काहीच दिवसांत तिथे अफगाणी फौज हल्ला करते. केवळ 21 लोक १०००० सैनिकांना कशाप्रकारे तोंड देतात. त्यांची शौर्यगाथा म्हणजे केसरी.

चित्रपटाचा विषय चांगला असला तरी मध्यंतरपर्यंत काहीच घडत नाही असे वाटते. सुरुवातीची लढाई, गाणं आणि पात्रांची ओळख या व्यतिरिक्त चित्रपटात काहीच पाहायला मिळत नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्य, जातीप्रथा यांवर चित्रपटात चांगले भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील संवाद देखील चांगले जमून आले आहेत. चित्रपटातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शेवटची लढाई. चित्रपटाचा शेवट काय असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत असले तरी हे 21 जण कशाप्रकारे शत्रूंचा सामना करतात हे खूपच छान प्रकारे दाखवण्यात आले आहे. अनेक तास लढाई करताना त्यांना थकवा आलेला असतो. बंदूक चालवून हातातून रक्त येत असते. पण तरीही ते लढत असतात हे पाहून नक्कीच अंगावर काटा येतो. चित्रपटातील अकॅशन खूपच चांगली आहे. तसेच बॅकराउंड स्कोर मस्त जमून आला आहे. अक्षयने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे, त्याचे करावे तितके कौतुक कमी. परिणीतीच्या वाट्याला खूपच कमी दृश्य आली आहेत.  चित्रपटात इशार सिंग व्यतिरिक्त इतर व्यक्तिरेखांना तितके महत्व देण्यात आलेले नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तसेच चित्रपटाची लांबी कमी झाली असती तर चित्रपट अधिक रंजक ठरला असता. पण तरीही ही शूरवीरांची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला हरकत नाही.  


Web Title: kesari movie review
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.