Chhichhore Movie Review : sushant singh rajput shraddha kapoor's Chhichhore | Chhichhore Movie Review : छिछोऱ्यांची दुनियादारी
Chhichhore Movie Review : छिछोऱ्यांची दुनियादारी
Release Date: September 06,2019Language: हिंदी
Cast: सुशांत सिंग रजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहीर राज भसीन, नवीन पॉलिशेट्टी
Producer: साजिद नाडियाडवालाDirector: नितेश तिवारी
Duration: 2 तास 26 मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देदंगल सारखा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नितेश तिवारीने या चित्रपटाद्वारे त्याच्या फॅन्सची निराशा केली आहे असेच म्हणावे लागेल.

प्राजक्ता चिटणीस

कॉलेज जीवन, हॉस्टेल लाईफ हे आपण आजवर अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. हीच कथा आपल्याला छिछोरे या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून आपल्याला आता काय पाहायला मिळणार याची आपल्याला जाणीव होते. केवळ जुनीच कथा असली तरी ती चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे.

अनिरुद्ध (सुशांत सिंग रजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) यांचा मुलगा इंजिनियरिंगला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या दोघांचा घटस्फोट झाल्यामुळे तो आपल्या वडिलांसोबतच राहात असतो. आपले आई-वडील दोघेही अतिशय हुशार असल्याने आपल्याला देखील पहिल्याच प्रयत्नात कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे याचे त्याच्यावर दडपण असते. पण त्याला काही प्रवेश मिळत नाही आणि त्याच दडपणाखाली तो मित्राच्या बाल्कनीतून खाली उडी मारतो. मला लोक लुजर समजणार अशी भीती त्याच्या मनात असते. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असले तरी काही केल्या त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसते. त्यानेच जगण्याची आशा सोडली असल्याने तो उपचाराला प्रतिसाद देत नाही असे अनिरुद्ध आणि मायाला डॉक्टर सांगतात. त्यामुळे आपल्या कॉलेजजीवनात लोक अनिरुद्धला आणि त्याच्या मित्रांना कसे लूजर समजायचे. पण त्याच्यावर त्यांनी सगळ्यांनी कशी मात केली ही गोष्ट त्याच्या मुलाला सांगतो आणि ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या मित्रांना परत बोलवतो. 

यशाच्या मागे धावू नका हा संदेश थ्री इडियट या चित्रपटात देण्यात आला आहे. छिछोरे हा चित्रपट देखील काहीसा असाच संदेश आपल्याला देतो. तसेच थ्री इडियटप्रमाणेच या चित्रपटात होस्टेलचे जीवन, रॅगिंग, मित्रांचा ग्रुप हे दाखवण्यात आले असल्याने अनेकवेळा आपल्याला हा चित्रपट पाहातना थ्री इडियटचीच आठवण येते. तसेच जो जिता वही सिकंदरमधील दोन गटातील टशन, स्टुटंड ऑफ द इयर या चित्रपटातील कॉलेजमधील स्पर्धा देखील या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेच काहीच नावीन्य नाहीये. सुशांत आणि श्रद्धाच्या मुलाचा अपघात झाल्यानंतर आता पुढे काय होणार याची कल्पना आपल्याला आधीच येते. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता राहात नाही. पण कथा नवीन नसली तरी हा चित्रपट चांगल्याप्रकारे मांडण्यात आलेला आहे. सुशांत सिंग रजपूत, सेक्साच्या भूमिकेतील वरुण शर्मा, डेरेकच्या भूमिकेतील ताहीर राज भसीन आणि ॲसिडच्या भूमिकेतील नवीन पॉलिशेट्टी यांनी चांगले काम केले आहे. सुशांत तरुणपणाच्या भूमिकेत जितका भावतो तितका तो उतारवयाच्या भूमिकेत भावत नाही. मुलगा सिरियस असताना डॉक्टरांशी बोलताना गंभीर होणारा सुशांत पुढच्याच दृश्यात मित्रांसोबत मजामस्करी करताना दिसतो हे मनाला पटत नाही. श्रद्धाच्या भूमिकेला तितकासा वाव नसल्याने तिची भूमिका लक्षात राहात नाही. तसेच सगळ्याच कलाकारांचे वाढलेले वय दाखवण्यासाठी त्यांचा प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आलेला आहे. पण श्रद्धामध्ये तिच्या कपड्यांची स्टाईल वगळता दुसरा काहीही बदल दाखवण्यात आलेला नाही ही गोष्ट मनाला नक्कीच खटकते. तसेच या मित्रांचे कॉलेज विश्व दाखवले असताना त्यांच्यातील बेवडा (सहर्ष कुमार शुक्ला) हा कॉलेजचा विद्यार्थी अजिबातच वाटत नाही. त्याला पाहून तो किती वेळ नापास झाला आहे असा प्रश्न नक्कीच पडतो. कॉलेजविश्व दाखवताना केवळ हॉस्टेल लाइफ, स्पर्धा इतक्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. हे सगळे इंजिनिअरींगचे विद्यार्थी आहे असा चित्रपटात उल्लेख असला तरी त्यांना कधी अभ्यास करताना किंवा वर्गात दाखवण्यातच आलेले नाही. दंगल सारखा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नितेश तिवारीने या चित्रपटाद्वारे त्याच्या फॅन्सची निराशा केली आहे असेच म्हणावे लागेल.

छिछोरे या चित्रपटात सगळ्याच जास्त आपल्याला भावतो तो वरुणचा अभिनय. फुकरे फेम वरुणने या चित्रपटात देखील कमाल केली आहे. त्याचसोबत या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या आणि विशेषतः कॉलेजमधील मुलांच्या टाळ्या घेऊन जाणार यात काहीच शंका नाही. कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर छिछोरे पाहाण्यास काहीच हरकत नाही. 

Web Title: Chhichhore Movie Review : sushant singh rajput shraddha kapoor's Chhichhore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.