Ratnagiri: दवाखान्यात दाखवूया म्हणून मुलाला घेतले, साडेतीन लाखाला विकले; निवळीतील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:34 IST2025-01-29T16:32:21+5:302025-01-29T16:34:43+5:30

बेळगावात एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली

Three arrested from Maharashtra in case of sale of child in Hukkeri taluka of Belgaum | Ratnagiri: दवाखान्यात दाखवूया म्हणून मुलाला घेतले, साडेतीन लाखाला विकले; निवळीतील दोघांना अटक

Ratnagiri: दवाखान्यात दाखवूया म्हणून मुलाला घेतले, साडेतीन लाखाला विकले; निवळीतील दोघांना अटक

चिपळूण : बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील मुलाच्या विक्री प्रकरणात महाराष्ट्रातील तिघांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील मुलाला चिपळूणमधून ताब्यात घेतले. हे मूल तालुक्यातील निवळी येथे व त्यानंतर जयगड येथे वास्तव्यास होते. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (४०, रा. माद्याळ, गडहिंग्लज, कोल्हापूर), मोहन बाबाजी तावडे (६४), संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पीरप्पा तळवार (४५, दोघे रा. निवळी, चिपळूण, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बेळगावात गेल्या महिन्यात बालिका विक्रीचे एक प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर हुक्केरीतील आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली आहेत. हुक्केरीतील प्रकाराबाबत अर्चना राजू मगदूम (रा. सुल्तानपूर, हुक्केरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू बसवाणी मगदूम यांच्याशी विवाह झाला होता. अर्चनाचे हे दुसरे लग्न असून, तिला पहिल्या पतीपासून एक मूल आहे. राजू मगदूम याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. 

मात्र, अर्चनाच्या मुलाची तब्येत चांगली राहत नव्हती. त्यामुळे त्याला पोटाचा विकार असून, शल्य चिकित्सा करायला हवी, असे संगीता सोमू हम्मण्णावर ऊर्फ गवळी हिने सांगितले. तसेच अर्चनाच्या मुलाला दवाखान्याला दाखवूया, असे सांगत तिने मुलाला आपल्याकडे घेतले. तिने मोहन बाबाजी तावडे, संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार यांचे परिचित असलेल्या दाम्पत्य नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी) यांना हे मूल साडेतीन लाख रुपयांना विकले. ते पैसे संगीता गवळी, मोहन आणि त्याची पत्नी संगीता यांनी वाटून घेतले.

या प्रकरणात संगीता गवळी, संगीता तावडे, मोहन तावडे यांना अटक करण्यात आली आहे. नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी, महाराष्ट्र) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

आठ दिवसांपूर्वी कराड येथील पोलिस या प्रकरणी चिपळुणात आले होते. त्याप्रमाणे सावर्डे पोलिस स्थानकाकडून त्यांच्या पथकाला साहाय्य करून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची बेळगाव व कोल्हापूर पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. - जयवंत गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, सावर्डे.

Web Title: Three arrested from Maharashtra in case of sale of child in Hukkeri taluka of Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.