Ratnagiri Crime: दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, शिक्षकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:32 IST2025-07-09T12:31:22+5:302025-07-09T12:32:03+5:30
घरी कुणी नसल्याचा फायदा उठवत केला हा प्रकार

Ratnagiri Crime: दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, शिक्षकास अटक
दापोली (जि. रत्नागिरी) : घरी सोडण्याच्या बहाण्याने आलेल्या एका ४६ वर्षीय झेडपी शिक्षकाने घरी कुणी नसल्याचा फायदा उठवत पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याचा खळबळजनक प्रकार दापोली तालुक्यात घडला आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून, पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.
किशोर काशीराम येलवे (रा. आगरवायंणी, दापोली) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो एका जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. त्याच्याविराेधात पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी शिक्षकाने मुलीला, ‘तुला न्यायला कोणी नाही का आलं?’ असे विचारले. त्यावर मुलीने नाही सांगताच, ‘मी तुला घरी सोडतो,’ असे सांगून तिला आपल्या दुचाकीवर बसविले. मुलीला घरी सोडल्यानंतर त्या मुलीच्या मागोमाग शिक्षकही घरात गेला.
त्यावेळी घरी कोणी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. ही संधी साधून त्याने त्या मुलीशी अश्लील चाळे केले. तसेच झालेला प्रकार कोणालाही सांगू नको, अशी धमकीही त्याने मुलीला दिली. त्यानंतर या शिक्षकाने तिथून पळ काढला.
या प्रकारामुळे ही मुलगी घाबरली आणि तिने शेजारी असलेल्या कुटुंबाला हे सांगितल्यानंतर दाभोळ पोलिस स्थानकात आजीने फिर्याद दिली.