Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:24 IST2025-12-25T15:20:33+5:302025-12-25T15:24:44+5:30
Rajasthan IT company Gangrape: एका नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर कंपनीच्या सीईओ आणि एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पतीने सामूहिक बलात्कार केला.

AI Image
राजस्थानच्या उदयपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर कंपनीच्या सीईओने आणि एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पतीने चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे कृत्य घडत होते, त्यावेळी कारमध्ये कंपनीची महिला एक्झिक्युटीव्ह हेड देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उदयपूरमधील शोभागपुरा येथील एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओच्या वाढदिवसानिमित्त आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला पीडित महिला मॅनेजर रात्री ९ वाजता पोहोचली. पहाटे १.३० वाजेपर्यंत चाललेल्या या पार्टीत सर्वांनी दारू प्यायली. पार्टी संपल्यानंतर पीडितेला घरी सोडण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तिला कारमध्ये बसवले.
कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध?
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, कारमधून जात असताना आरोपींनी वाटेत एका दुकानातून सिगारेट आणि कोल्डड्रिंक खरेदी केले. तिला कोल्डड्रिंक पिण्यास भाग पाडले, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले असावे असा संशय आहे. ते कोल्डड्रिंक पिताच पीडित तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले.
सकाळी शुद्धीवर येताच प्रकार उघड
घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिला आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. तिने विलंब न करता थेट पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.
पोलीस कारवाई आणि पुढील तपास
उदयपूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत कंपनीचा सीईओ आणि एक्झिक्युटीव्ह हेडचा पती यांना ताब्यात घेतले. घटनेच्या वेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या महिला एक्झिक्युटीव्ह हेडचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत. हॉटेलमधील आणि प्रवासातील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्या रात्री कारमध्ये नेमके काय घडले? याचा तपास केला जात आहे.