तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:32 IST2026-01-09T16:31:53+5:302026-01-09T16:32:24+5:30
बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे, ते थोडे घाबरलेले आहेत - रोहित पवार

तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार
पुणे : पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळत आहे. इथे प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवारांनी पिंपरीतील आमदार, सत्ताधारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत.
अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी एका आमदारावर टीका केली होती. मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो. असं ते म्हणाले होते. याचा आधार घेत आमदार महेश लांडगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या! अशी टीका महेश लांडगे यांनी केली.
त्या विधानावर पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असताना रोहित पवारांनी पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले, बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे. ते थोडे घाबरलेले आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी टीका पवार यांनी त्यांच्यावर केली आहे.
नागरिकांना योग्य न्याय देणार
काही एजन्सींशी आम्ही चर्चा करत आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. कचऱ्याचा मुद्दा आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे. गुन्हेगारी वाढताना आपण पाहू शकतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. या सर्व मुद्द्यांवर लक्ष देत नागरिकांना योग्य न्याय कसा देता येईल, याचा विचार सुरू असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे.