डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:50 IST2025-07-09T14:49:35+5:302025-07-09T14:50:44+5:30
अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते.

डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
पुणे: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही. तो अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा उत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केली आहे.
‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्य चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.’’
गणेश मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरूपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले जाते. परंतु गणेशोत्सवाचे वैभव कायम राखण्यासाठी डीजेवर नको ती गाणी लावून बाप्पाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळांना यापुढील आर्थिक साह्य केले जाणार नाही, असे बालन यांनी स्पष्ट करून हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.