आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही; ते काम अजित पवार पूर्ण करत आहेत - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:15 IST2026-01-03T16:13:52+5:302026-01-03T16:15:05+5:30
शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत असून आपल्या समोर धनशक्ती आहे.

आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही; ते काम अजित पवार पूर्ण करत आहेत - उदय सामंत
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. गुन्हेगारीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटले असून, दोघेही एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावरून मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाष्य केलं आहे.
सामंत म्हणाले, आपले मित्र पक्ष पत्रकार परिषद घेत आपलं काम सोपं करत आहेत. आजही त्यांची पत्रकार परिषद आहे. उमेदवारांना माझी विनंती आहे. आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही. आपलं काम अजित पवार पूर्ण करत आहेत. आपल्याला काही बोलायची गरज नसल्याचे उमेदवारांना सांगितले आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर लढत आहे. आम्ही स्वतंत्र लढत आहोत. उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर १६ तारखेला जो निकाल लागेल. त्यावेळी महापौर बनवत असताना आपल्याला त्यांना विचारात घ्यावंच लागेल. हे शहर बाळासाहेबांच आवडता शहर होत. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाण महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. सगळीकडे आपलं वातावरण आहे.
जनता तरुणाच्या मागे असते
शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आपल्या समोर धनशक्ती आहे. आम्ही कुणावर बोलत नाही. एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. काही लोक पत्रकार परिषदेमुळे तिकडे जायचं विसरले. पण आपण सगळीकडे जाऊ. घराघरांपर्यंत पोहोचू. तीन तीन चार चार वेळा लोकांच्या घरी जाऊ. प्रचाराला लागा काम करा. काही नवे उमेदवार आपण दिले आहेत. २००४ मध्ये मी निवडणूक तरुण म्हणून लढलो त्यावेळी मी पडलो. आज पाचवेळा मी आमदार झालो आहे. म्हणून जनता तरुणाच्या मागे असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.