मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी
By निलेश राऊत | Updated: May 11, 2024 17:45 IST2024-05-11T17:45:29+5:302024-05-11T17:45:50+5:30
याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे...

मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी
पुणे :मतदानाच्या दिवशी (१३ मे) मतदान केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ७९६ आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे आशा वर्कर यांचे असून, त्यांना केवळ २०० रुपये मानधन न देता ७०० रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा वर्कर्स युनियन, पुणे जिल्हा (सीटू) यांनी केली आहे.
याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे. त्यासाठी त्यांना १२ तासांच्या कामासाठी केवळ २०० रुपये मानधन दिले जाईल, असे तोंडी सांगितले आहे. तसेच वेगळा प्रवास भत्ता किंवा जेवणाची व्यवस्था केलेली नाही.
दरम्यान, आशा वर्कर यांना सध्या कोणतीच वेतन श्रेणी लागू नाही. तसेच अनेक आशा वर्कर यांची निवासापासून लांबच्या मतदान केंद्रांवर नियुक्ती केली गेली आहे. त्यासाठी त्यांना प्रवास खर्चासाठी बरीच पदरमोड करावी लागणार आहे. आशा वर्कर त्यांना त्यांच्या कामावर आधारित मोबदला मिळत असल्याने, त्या दिवशी त्यांना त्यांचे काम करता येणार नाही आणि त्यांचा मोबदला देखील मिळणार नाही. विशेष म्हणजे काही आशा वर्कर यांचे स्वतःचे मतदान १३ मे रोजीच आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार कसा बजावायचा याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.
ज्या आशा वर्कर यांच्या घरात अपंग किंवा वृद्ध व्यक्तींची सेवा, स्वतःचे आजारपण अशी समस्या असेल त्यांना या कामातून सूट देण्यात यावी, अशी मागणी युनियनने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे मोघे यांनी सांगितले.