पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:33 IST2026-01-12T12:31:53+5:302026-01-12T12:33:03+5:30
गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल. मी गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही,

पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस
पुणे : पुण्यातील कोयता गँग, वाढत्या गुन्हेगारीबाबत अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना इशारा दिला होता. आम्ही आता पोलिसही वाढवले आहेत. तुम्ही ही गुन्हेगारी संपवा असं त्यांनी एका भाषणात सांगितले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आयोजित 'संवाद पुणेकरांशी' या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आयोजित 'संवाद पुणेकरांशी' या कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली आहेत. आता आमच्या सहकारी पक्षाचे उमेदवार असल्याचे सांगत आहेत. गुन्हेगारी संपली पाहिजे असे म्हणायचे आणि त्यांना उमेदवारी द्यायची. गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देणे पुणेकरांना रुचणारे नाही. गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल. मी गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्याच्या ५८० बिलियन डॉलर जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा
राज्याच्या ५८० बिलियन डॉलर जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा ७८ बिलियन आहे, तो २८० बिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी आम्ही 'पुणे ग्रोथ हब' ही संकल्पना राबवत आहोत. पुण्याचा विस्तार, संधी आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराचा एकात्मिक विकास केला जाईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कुटुंब एकत्र येत असतील तर ही चांगली बाब
दोन भाऊ आणि बहीण भाऊ एकत्र आले या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले , दोन भाऊ एकत्र येण्याचे क्रेडिट मला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कुटुंब एकत्र येत असतील तर ही चांगली बाब आहे. बहिण भाऊ एकत्र आले की नाही हे नंतरच कळेल.
राज्यसरकारमध्ये अजित पवार हेच दादा
भाजपपक्षामध्ये चंद्रकांत पाटील हे दादा आहेत. तर राज्यसरकारमध्ये अजित पवार हेच दादा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रॅपिड प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.