सुप्रियाताई ३ लाख मतांनी जिंकणार, भाजपचे दात त्यांच्याच घशात घालणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 03:29 PM2024-03-31T15:29:01+5:302024-03-31T15:32:49+5:30

Baramati Lok Sabha: पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Supriya sule will win by 3 lakh votes form baramati lok sabha seat Rohit Pawar attack on bjp | सुप्रियाताई ३ लाख मतांनी जिंकणार, भाजपचे दात त्यांच्याच घशात घालणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

सुप्रियाताई ३ लाख मतांनी जिंकणार, भाजपचे दात त्यांच्याच घशात घालणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तर महायुतीकडून कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत सुप्रिया सुळे या यंदाच्या निवडणुकीत ३ लाख मतांनी निवडून येतील, असा दावा केला आहे.

भाजपसह सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "बारामतीतून सुप्रियाताई लढणार हे आधीच निश्चित होतं, त्यामुळं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत," असा इशारा रोहित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीसह पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांची पत्नी आणि दोन मुले वगळता पवार कुटुंबातील इतर सर्व सदस्य राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान अजित पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

सुनेत्रा पवारांनी कोणत्या शब्दांत आव्हान दिलं?

बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या आव्हानाविषयी प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांनी म्हटलं की, "ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. त्यामुळे ही जनतेची लढत आहे," असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.

सुनील तटकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस आहे. कारण आज महायुतीच्या माध्यमातून मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी दिली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे महादेव जानकर या सर्वांचेच आभार मानते," असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Supriya sule will win by 3 lakh votes form baramati lok sabha seat Rohit Pawar attack on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.