कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 09:58 IST2025-03-15T09:57:05+5:302025-03-15T09:58:08+5:30

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले

pune news ravindra dhangekar flexibilism in the town indirectly targeting MLA | कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

- हिरा सरवदे

पुणे :
कॉंग्रेसचा त्याग करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले जात आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले जुने वाद आणि मतभेद मिटण्याऐवजी ते तिव्र होत असल्याचे चित्र आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर यांनी राज्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला होता. या विजयामुळे धंगेकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आणि क्रेझ निर्माण केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा त्यांना विधानसभेला संधी दिली. या निवडणुकीत हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाची परतफेड करत धंगेकर यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने महायुतीचे अनेक नेते महायुतीच्या जवळ गेले. त्यामध्ये धंगेकर यांनी कॉंग्रेसला रामराम करत शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. धंगेकर यांचे पक्षांत झाल्याने त्यांचे व महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद व वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्याची प्रचिती येत आहे.

धंगेकर यांचे पक्षांतर झाल्यानंतरही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यांसोबत असलेले मतभेद तीव्र होत आहेत. भाजपच्या नेत्यांनी पूर्वीचे वाद मिटणार नाहीत, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी जाहीरपणे धंगेकर यांच्यावर टीका करत, जुने वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर जनतेच्या मनातील आमदार असे होर्डिंग लावले होते. त्यानंतर आता धंगेकर यांच्या नावाने कसबा मतदारसंघात फ्लेक्स झळकत आहेत. धंगेकर यांच्याकडून विद्यमान आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले जात आहे. 

फ्लेक्सवर काय?  

कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर...

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असं आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र, घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही.

Web Title: pune news ravindra dhangekar flexibilism in the town indirectly targeting MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.