देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 15:17 IST2024-04-19T15:14:14+5:302024-04-19T15:17:08+5:30
अजित पवार यांनी बोलताना ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल,अन्यथा हात आखडता घेइन' असे वक्तव्य केले होते

देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी डाॅक्टरांचा इंदापुरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी बोलताना ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल,अन्यथा हात आखडता घेइन,असे वक्तव्य केले होते.या वक्तव्याचा शरद पवार यांनी कन्हेरी येथे बोलताना समाचार घेतला आहे.
यावेळी पवार म्हणाले, अनेक लोक काहीतरी सांगत असतात. मात्र, आपल्याला वाद वाढवायचा नाही. आपल्याला संघर्ष करायचा नाही. आपल्याला केवळ योग्य बटन दाबायचे आहे. काल कुणीतरी बटन कसे दाबायचे हे सांगितले. पण मी तसे सांगणार नाही. ते सांगताना ते बटन दाबल तर काही कमी पडुन देणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले आहे. मी त्याच्या खोलात जाउ इच्छीत नाही. देणे घेणे करुन मत मागायची आमची भुमिका नाही. लोकांमध्ये काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करुन मते मागायची ही आमची भुमिका असल्याचा टोला यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
पवार पुढे म्हणाले, मोदी फडवणीस यांच्यासह अन्य नेते आमच्या विरोधात घटना बदलण्याचा खोटा प्रचार सुरु असल्याचे सांगतात. मात्र, त्यांचेच मंत्री घटना बदलणार असल्याचे सांगतात. घटना बदलण्याचा विचार गंभीर आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार महत्वपुर्ण आहे. त्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.